ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 21 - ढेरी सुटलेले पोलीस मामा तुम्ही सर्रास पाहिले असतील. त्यावरून होणार विनोद, टीकाटिप्पण्याही तुम्ही ऐकल्या असतील. पोलीस खात्यातील हे वैगुण्य दूर करण्यासाठी पोलिसांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जावे, असे आदेश काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काढले होते. मात्र पोलिसांच्या पोटांचा आकार काही कमी झाला नाही. आता अशा तुंदिलतनू पोलिसांविरोधात लष्कराच्या एका माजी जवानाने थेट कोर्टात धाव घेतली आहे.
हे प्रकरण पश्चिम बंगालमधील असून, पॅरामिलिटरी फोर्समधील निवृत्त सैनिक असलेल्या आणि कोलकात्यात राहणाऱ्या कमल डे यांनी लठ्ठ पोलिसांविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने प्रकाशित केले आहे. या याचिकेतून डे यांनी पोट सुटलेल्या पोलिसांच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच अशा अनफिट पोलिसांच्या भरवशावर आम्ही शांत झोपू कसे शकतो, असा सवाल केला डे यांनी केला आहे.
कमल डे यांनी आपल्या आरोपांना भक्कम करण्यासाठी पुरावा म्हणून कोलकात्यात कर्तव्यावर असणाऱ्या 18 पोट सुटलेल्या पोलिसांचे फोटो याचिकेसह न्यायालयात सादर केले आहे. तसेच पश्चिम बंगालचे गृहमंत्रालय आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक, कोलकात्याचे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे.
या याचिकेत डे यांनी पोलीस कायदा 1861 आणि त्यातील नियमांचे कलम क्र. 7 मध्ये अनफिट पोलिसांना सेवेतून निलंबित करावे, तसेच ते जोपर्यंत तंदुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना पुन्हा सेवेत घेऊ नये, असा उल्लेख असल्याचेही सांगितले.
पोलिसांच्या तंदुरुस्तीबाबत काही उपाय सुचवणाऱ्या डे यांनी लष्करात सेवेत असतानाच्या स्वत:च्या तंदुरुस्तीचा दाखला दिला आहे. त्यात त्यांनी देशाच्या विविध भागात केलेली सेवा आणि लष्कराच्या कठोर कवायतीचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी स्वत:च्या तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष करून स्वत:चेच हसे करून घेतले आहे.