नवी दिल्ली : सैन्यात वीरता पुरस्कार मिळविणारा जवान शहीद झाल्यास त्यांच्या पत्नीला मदत म्हणून मिळणारा भत्ता पत्नीने अन्य कुणाशी पुनर्विवाह केल्यानंतरही तिला मिळणार आहे. आतापर्यंत दिवंगत पतीच्या भावाशी विवाह केला तरच भत्ता मिळत होता. ही अट संरक्षण मंत्रालयाने काढून टाकली आहे. शहिदाच्या विधवा पत्नीने दिवंगत पतीच्या भावाशिवाय अन्य कोणत्याही व्यक्तीशी पुनर्विवाह केला तरी तिला मिळणारा भत्ता कायम राहणार आहे. संरक्षण मंत्रालयानं 1972 मध्ये जाहीर केलेल्या एका आदेशानुसार वीरता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जवानांना भत्ता दिला जातो. खुद्द पुरस्कार मिळवणाऱ्या जवानाला हा भत्ता दिला जातो आणि त्याच्या मृत्यूनंतर हा भत्ता त्याच्या विधवा पत्नीला मिळतो. ही पत्नी कायदेशीररित्या विवाहीत असायला हवी. आत्तापर्यंत विधवा पुनर्विवाह करेपर्यंत किंवा तिच्या मृत्यूपर्यंत तिला हा भत्ता दिला जात होता. भत्ता सुरू राहण्यासाठी पतीच्या भावासोबत विवाह करण्याची अट मागे घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. या मुद्द्यावर विचार केल्यानंतर सरकारनं ही अट आता हटवलीय. यासाठी 16 नोव्हेंबर रोजी एक पत्र जाहीर करण्यात आलंय.16 नोव्हेंबरला केंद्राने यासंदर्भात लेखी सूचना दिल्या असून यापुढे वीरता पुरस्कार मिळविणा-या जवानाला विशेष भत्ता मिळेल. त्याच्या मृत्यूनंतर त्यांची कायदेशीर पत्नी या भत्त्यासाठी पात्र असेल. या पत्नीला तिच्या मृत्यूपर्यंत हा विशेष भत्ता लागू असेल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
जवानाच्या विधवा पत्नीला पुनर्विवाहानंतरही मिळणार भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 4:58 PM