नितीन अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पनामा पेपर्स प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची अंमलबजावणी संचालनालयाने चाैकशी केली. त्यानंतर त्यांची सासू आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन या चांगल्याच भडकल्या. लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत, असा शाप त्यांनी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना दिला. जया बच्चन एवढ्या संतापल्या हाेत्या, की बाेलताना त्यांना श्वास घ्यायला त्रास हाेऊ लागला.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, तुम्ही आमचा गळा आवळा. तुम्हीच सभागृह चालवा. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांबद्दल काय करत आहात? आम्हाला न्याय हवा आहे. मात्र, सत्तेकडून तशी अपेक्षा करू शकत नाही. उपसभापती भुवरेश्वर कालिका यांच्यावरही जया बच्चन उखडल्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही बाेलूच नका. बाेलायची मला संधी आहे. अनेक माेठे मुद्दे आहेत. मात्र, केवळ एका कारकुनी चुकीमुळे ३-४ तास चर्चेसाठी देता. काय सुरू आहे? हे लाजिरवाणे आहे. जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात माेठा गदाराेळ झाला आणि त्यानंतर कार्यवाही स्थगित करण्यात आली. जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक यांच्यापाठाेपाठ सून ऐश्वर्या यांनाही ईडीने चाैकशीसाठी दिल्लीत बाेलाविले हाेते. त्यानंतर जया बच्चन प्रचंड नाराज दिसल्या.