नवी दिल्ली - मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना (Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली. मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने संजय राऊतांना अटक केली. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या भांडूप येथील मैत्री या निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर ईडीने राऊतांना अटक केली. यानंतर आता राऊत यांच्या अटकेवर मनोरंजन क्षेत्रातील लोकांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी संजय राऊत यांच्या अटकेवर संताप व्यक्त केला आहेत. फक्त 11 लाख रुपयांसाठी त्रास दिला जात आहे असं म्हणत 2024 पर्यंत हे सर्व सुरू राहील, असं जया बच्चन यांनी म्हटलं. या संपूर्ण प्रकरणाला भाजपाच जबाबदार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच या प्रकरणावर दिग्दर्शक अशोक पंडित आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जया बच्चन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊत यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचा दुरुपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल जया बच्चन यांना करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थातच. ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात, असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे, असं विचारलं असता होय, मला माहीत आहे, असं जया बच्चन म्हणाल्या. ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? असा सवाल केला असता, जया बच्चन यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. 2024 पर्यंत हे सर्व चालेल, असं त्या म्हणाल्या.
जया बच्चन यांच्यानंतर शर्लिन चोप्रा हिनेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने ट्विट केलं आहे. शर्लिनने या ट्विटमध्ये राऊत यांचं कोट वापरून आपलं मत व्यक्त केलं आहे. मोदींच्या पक्षात सर्व श्रीकृष्ण आहेत - संजय राऊत, सुदर्शन चक्र तर सुटले आहे, असं ट्विट शर्लिनने केलं आहे. अशोक पंडित यांनी संजय राऊत आणि बरखा दत्त यांचा फोटो शेअर करत, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. बरखा दत्त यांची आणखी एक शिकार, असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.