पणजी : जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जर लाचप्रकरणी सरकारने सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.मी स्वत: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी शुक्रवारी बोललो, तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे जैकाची फाईल कधीही आली नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्याचे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केले. जैका यंत्रणाच प्रत्येक निविदेवर लक्ष ठेवत होती. काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही नेत्याविरुद्ध किंवा मुख्यमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप झाला व त्याबाबत प्राथमिक पुरावा देखील दिसला तरी पक्ष त्याविरोधात कारवाई करतो. भाजपा मात्र मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह देशभरातील त्यांच्या सर्व भ्रष्ट मंत्र्यांना पूर्णपणे पाठीशी घालत आहे, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी या वेळी केली.माजी मंत्री मिकी पाशेको यांची शिक्षा माफ करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविणाऱ्या गोवा सरकारला नैतिकतेवर बोलण्याचा किंचितही अधिकार नसल्याचे ते म्हणाले. गोव्यातील इंग्रजी माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांना अनुदान द्यायला हवे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणी व मराठी शाळांसह इंग्रजी माध्यमातील शाळांनाही सवलत द्यावी, असे सिंह या वेळी म्हणाले. (खास प्रतिनिधी)
जैका लाच प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
By admin | Published: August 02, 2015 2:58 AM