चेन्नई - तामिळनाडूचे वनमंत्री श्रीनिवासन यांनी अण्णाद्रुमूकच्या सर्वेसर्वा आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूसंबंधी धक्कादायक माहिती उघड केली आहे. अण्णाद्रुमूकच्या मंत्र्यांनी जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांच्या तब्बेतीची चुकीची माहिती देत जनतेची दिशाभूल केला असल्याचा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी जयललिता यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांनी चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. २२ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 75 दिवसांचा त्यांचा लढा अपयशी ठरला आणि अखेर त्यांचं निधन झालं.
'जयललिता रुग्णालयात दाखल असताना त्यांना भेटण्याची परवानगी कोणालाही नव्हती. नेमकं काय चालू आहे आणि तथ्य काय आहे याबद्दल कोणाला माहित नव्हतं. त्या इडली खात असल्याचा आमचा दावाही सपशेल खोटा होता', असं श्रीनिवासन यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी सार्वजनिक सभेला संबोधित करत असताना श्रीनिवासन यांनी हा खुलासा केला. यावेळी त्यांनी जयललिता यांच्याबद्दल खोटी माहिती दिली म्हणून जनतेची माफीही मागितली.
'अनेक नेत्यांनी जयललितांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र सर्वांना पहिल्या माळ्यावरच थांबवण्यात आलं होतं. त्यापुढे जाण्याची परवानगी कोणालाच देण्यात आली नव्हती. आम्हाला खुर्ची किंवा जमिनीवर बसवलं जायचं. पण कोणीही अम्मांना भेटलं नाही', अशी माहिती श्रीनिवासन यांनी दिली आहे.
राज्यपाल सी विद्यासागर राव आणि इतर मान्यवरांनाही जयललिता यांच्या रुममध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. 'पक्षाचं गुपित बाहेर पडू नये यासाठी आम्ही खोटं बोललो', असं श्रीनिवासन बोलले आहेत.
एका आठवड्यापुर्वी श्रीनिवासन यांनी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबावर जयललितांच्या उपचाराबद्दल गुप्तता राखल्याचा आरोप केला होता. जयललिता यांच्या मृत्यूला शशिकला आणि त्यांचं कुटुंब जबाबदार असल्याचा आरोपही श्रीनिवासन यांनी केला होता. 'रुग्णालयात असताना शशिकला आणि त्यांच्या कुटुंबाने एकालाही अम्मांजवळ जाऊ दिलं नाही. जयललिता यांचा मृत्यू कसा झाला हे फक्त त्यांनाच माहित आहे', असा आरोप श्रीनिवासन यांनी केला आहे.