नवी दिल्ली : १६ वर्षांपूर्वीच्या एका अपसंपदा खटल्यात ठोठावलेली चार वर्षे कारावासाची शिक्षा तहकूब ठेवण्यास तसेच जामिनावर मुक्त करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक प्रमुख जे़ जयललिता यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आपली प्रकृती बरी नाही. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्यामुळे आपणास तात्काळ जामीन मिळावा़ आपल्या जामीन अर्जावर उद्या, शुक्रवारी तत्काळ सुनावणी व्हावी, अशी विनंती जयललितांनी आपल्या अपिलात केली आहे़ उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून ६०.६५ कोटी रुपयांची अधिक संपत्ती जमविल्याच्या खटल्यात, सर्वोच्च न्यायालयाने बेंगळुरूत नेमलेल्या विशेष न्यायालयाने जयललिता यांना २४ सप्टेंबर रोजी चार वर्षांच्या कारावासाची व १०० कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. हा निकाल होताच अपात्रता लागू होऊन आमदारपद व मुख्यमंत्रिपद गेलेल्या जयललिता तेव्हापासून येथील तुरुंगात आहेत़ ७ आॅक्टोबरला उच्च न्यायालयाने जयललितांना जामीन देण्यास तसेच त्यांची शिक्षा तहकूब करण्यास नकार दिला होता़ यानंतर दुसऱ्याच दिवशी जयललिता सर्वोच्च न्यायालयात दाद मागतील, अशी अपेक्षा होती़तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रमाणित प्रत न मिळाल्यामुळे बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकली नाही़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
जामिनासाठी जयललिता सुप्रीम कोर्टात
By admin | Published: October 10, 2014 3:32 AM