ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २३ - अन्य राज्यांमधील विधानसभा निवडणुकींचा खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत खोटा ठरवत राज्यात पुन्हा सत्तारूढ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता यांनी आजा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मद्रास विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणा-या जयललिता यांना राज्यपाल के. रोसय्या यांनी पदाची शपथ दिली.
गेल्या आठवड्यात लागलेल्या निकालात जयललिता यांच्या एआयएडीएमके या पक्षाने २३४ पैकी १३४ जागा जिंकत सलग दुस-यांदा सत्ता मिळवण्याचा नवा अध्याय लिहीला आहे. गेल्या ३२ वर्षांमध्ये अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
जयललिता यांच्यासह मंत्रीमंडळातील २९ सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी जयललिता यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. या सोहळ्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दोन वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूकीत जयललिता यांनी क्लीनस्वीप विजयाची नोंद केली होती. त्यावेळी लोकसभेच्या ३९ जागांपैकी जयललिता यांच्या पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या.