चेन्नई : अण्णाद्रमुकच्या प्रमुख जयललिता व त्यांच्या निकटच्या स्नेही शशिकला यांच्याविरुद्धची १९ वर्षांपासून सुरू असलेली कारवाई त्यांनी चक्रवाढ शुल्क भरल्यानंतर आयकर विभागाने अंतिम आदेश काढून संपुष्टात आणली आहे.गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान जयललिता यांचे वकील जे. करुपय्या यांनी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाला निवेदन देऊन, आयकर विभागाने चक्रवाढ शुल्क स्वीकारून अंतिम आदेश जारी केल्याचे सांगितले. आयकर विभागाचे सरकारी वकील के. रामासामी यांनी हे प्रकरण मागे घेण्याकरिता ते याचिका दाखल करणार असल्याचे यावेळी सांगितले. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजी जयललिता व शशिकला यांनी आपल्या व्यक्तिगत क्षमतेनुसार व त्यांच्या भागीदारीतील कंपनीसोबत मिळून चक्रवाढ शुल्काच्या रूपात १.९९ कोटी रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध १९ वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाच्या समाप्तीची प्रक्रिया सुरू झाली होती. १९९३-९४ करिता जयललिता यांनी ३०,८३,८८७ रुपये, तर शशिकला यांनी २८,०७,९७२ रुपयांचे चक्रवाढ शुल्क भरले. शशी एंटरप्राइजेसने १९९१-९२ करिता ७५,३३,३३० रुपये व १९९२-९३ करिता ६५,६७,८७२ रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षी जून महिन्यात यासंबंधी समझोता करण्याचे निवेदन देण्यात आले होते. आयकरने १९९१-९२ व १९९२-९३ मध्ये आयकराचे परतावे न भरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. (वृत्तसंस्था)
आयकराच्या १९ वर्षे जुन्या प्रकरणातून जयललिता मुक्त
By admin | Published: January 09, 2015 2:13 AM