ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १ - श्रीलंकेच्या संरक्षणखात्याच्या वेबसाईटवर भारताविषयी असलेल्या आक्षेपार्ह मजकूरामुळे तामिळनाडूमध्ये श्रीलंकेविरोधात प्रक्षोभ उसळला असून भारताने श्रीलंकेशी असलेले संबंध तोडावेत अशी टोकाची मागणी करण्यात येत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मच्छिमारांच्या प्रश्नावरून अनेक पत्रे लिहिली आहेत. या पत्रांचा उल्लेख करताना श्रीलंकेच्या वेबसाईटवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत या नेत्यांबाबत टिप्पणी करण्यात आली होती आणि त्याचा निषेध तामिळनाडूमधल्या नेत्यांनी केला आहे. श्रीलंकेने या वेबसाईटवर सदर लेखात असलेले कार्टून व लेख काढून टाकला असून या प्रकरणाची निश्चित माहिती मिळाल्यावर भाष्य करू असे श्रीलंकेच्या उच्च अधिका-यांनी भारतीय न्यूज चॅनेलना सांगितले.
दरम्यान, श्रीलंकेशी विळा-भोपळ्याचं सख्य असलेल्या तामिळनाडूतल्या राजकीय पक्षांनी या प्रकरणी एकजूट दाखवली असून श्रीलंकेविरोधात सगळे एकत्र आले आहेत. तर या सगळ्या प्रकरणाबाबत मोदीसरकार गप्प का आहे असेही विचारण्यात येत आहे. जयललिता या मोदी सरकारसाठी त्रास होत असल्याचं, त्यांच्यात व मोदींमध्ये जमत नसल्याचं इत्यादी वाट्टेल त्या टिप्पणी या लेखात करण्यात आल्याचं समजतं. यावरून झालेल्या गदारोळानंतर सदर लेख चुकून अपलोड झाल्याचं सांगत श्रीलंका सरकारनं तो वेबसाईटवरून काढून टाकल्याचं श्रीलंकेचे एक मंत्री डग्लस देवानंद यांनी सांगितले.