चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निवासस्थानाचे स्मारकात रूपांतर करण्यास, त्यांची भाची दीपा यांनी विरोध केला आहे. या योजनेला विरोध करतानाच याविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संपत्तीवर दावा करणे माझा नैतिक व कायदेशीर अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे नाटक असल्याची टीका दीपा जयकुमार यांनी केली.मात्र, जयललिता यांचे निवासस्थान ताब्यात घेताना, त्यांच्या सर्व जवळच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात येईल, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तिथे कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.भाजपा उत्सुकअण्णा द्रमुकचे दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी गेल्या काही महिन्यांत तब्बल सहा वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीत एकत्रित अद्रमुकशी समझोता करून, तामिळनाडूमध्ये स्थान निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्ष विरोधकांसमवेत असल्याने अण्णा द्रमुकशी समझोत्याचे गणित भाजपा मांडत आहे.
जयललितांच्या बंगल्यात स्मारक नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:05 AM