नवी दिल्ली : बेहिशेबी संपत्ती कमावल्याच्या खटल्यात निर्दोष मुक्तता करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालास अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिल्याने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री एम. जयललिता यांची खुर्ची तूर्तास तरी सलामत राहिली आहे. तमिळनाडूतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० वर्षांपूर्वी जयललिता यांच्यावर दाखल केलेला हा खटला सर्वोच्च न्यायालयाने वर्ग केल्याने कर्नाटकात चालला होता. तेथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवून चार वर्षांचा कारावास ठोठावल्यानंतर जयललिता यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. त्यानंतर अपिलात कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यावर ‘अम्मा’ पुन्हा मुख्यमंत्री झाल्या आहेत.न्यायालयाने जयललिता यांना नोटिस काढून पुढील सुनावणी आठ आठवड्यांनी ठेवली. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती दिली जावी, अशी विनंती कर्नाटक सरकारने केली. जयललिता यांना निदान दोन महिन्यांसाठी तरी दिलासा मिळाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)जयललिता यांची संपत्ती उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांहून ३४.५० टक्के (६६.५ कोटी ) जास्त आढळली, हे अभियोग पक्षाचे म्हणणे मान्य करून सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरविले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची बेहिशेबी संपत्ती फक्त ८.१२ टक्के (२.८२ कोटी ) असल्याचा निष्कर्ष काढत त्यांना निर्दोष मुक्त केले होते. मात्र कर्नाटक सरकारने हे गणित चुकीचे आहे, असे म्हणत अपील केले आहे.
जयललिता यांची खुर्ची तूर्तास सहीसलामत
By admin | Published: July 28, 2015 3:29 AM