बेंगळुरू /चेन्नई: बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या गुन्ह्यातून कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याने अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचा पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. बंगळुरुमध्ये सकाळी ‘अम्मां’च्या बाजूने निकाल जाहीर होताच अण्णा द्रमुकच्या असंख्य कार्यकर्त्यांनी तमिळनाडूत सुरु केलेला विजयोत्सव रात्री उशिरापर्यंत सुरु होता. आठ महिन्यांपूर्वी जयललिता यांच्या राजीनाम्यानंतर राज्य प्रशासनास आलेली मरगळ दूर होऊन तमिळनाडूच्या राजकारणास आता नवी कलाटणी मिळेल, असे मानले जात आहे. सोमवार आणि मंगळवार अष्टमी आणि नवमी असल्यामुळे बुधवार हा शुभ दिवस मानण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी जयललिता यांचे मुख्यमंत्रीपदावरील ‘कमबॅक’ बुधवारी होईल, अशी शक्यता अण्णाद्रमुकच्या सूत्रांनी वर्तवली.. न्या. सी.आर. कुमारस्वामी यांनी खचाखच भरलेल्या न्यायदालनात ११ च्या ठोक्याला प्रवेश केल्यानंतर अवघ्या एक मिनिटांत निर्णयाचे मुख्य अंश वाचून दाखविले. सर्व अपील स्वीकारतानाच दोषींना मुक्त केले जात असल्याचा आदेश देत त्यांनी अवघ्या चार मिनिटांत कामकाज आटोपले.कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करताना एकल पीठाच्या न्यायाधीशांनी जयललिता यांच्या पूर्वाश्रमीच्या मैत्रीण शशीकला नटराजन आणि त्यांच्या नातेवाईक जे. एलावरासी तसेच जयललितांपासून विभक्त झालेले दत्तक पुत्र व्ही.एन. सुधाकरण यांनाही निर्दोष ठरविले. कनिष्ठ न्यायालयाने या सर्वांना चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. न्या. कुमारस्वामी निर्णयाचे मुख्य अंश वाचल्यानंतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आसनस्थ झाले तेव्हा न्यायालयात उपस्थित अण्णाद्रमुक समर्थक वकिलांनी परस्परांचे अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला. त्यांनी हात उंचावत न्यायाधीशांचे आभारही मानले. अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात जणू दिवाळी साजरी केली. जयललितांच्या ‘पोस गार्डन’ निवासस्थानाबाहेर आणि अण्णा द्रमुकच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, पारंपरिक ढोलताशे वाजवत, गुलाल उधळत जल्लोष साजरा केला. (वृत्तसंस्था)
जयललितांचा ‘कमबॅक’!
By admin | Published: May 12, 2015 3:13 AM