नवी दिल्ली - केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन (Farmers Protest) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये शेतकरी आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांनी भिडले असून त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या हाणामारीत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरच्या शाहपूर पोलीस ठाणे हद्दतील सोरम गावात हा सर्व भयंकर प्रकार घडला आहे. शेतकरी आणि भाजपा कार्यकर्ते हे आमनेसामने आले. दोघांमध्ये टोकाचा वाद झाला आणि या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत झालं. या हाणामारीत बरेच लोक जखमी झाले आहेत. या घटनेबाबत जयंत चौधरी यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. "शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही, निदान त्यांना चांगली वागणूक तरी द्या" असं चौधरी यांनी म्हटलं आहे. तसेच जयंत चौधरी यांनी काही जखमी शेतकऱ्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
"शेतकऱ्यांची निदान थोडी इज्जत ठेवा"
"सोरम गावात भाजपा कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्यात संघर्ष झाला. अनेक लोक जखमी झाले. शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही, निदान त्यांना चांगली वागणूक तरी द्या. शेतकऱ्यांची निदान थोडी इज्जत ठेवा. शेतकरी कायद्यांचे फायदे सांगायला जाणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या गुंडागर्दीला गावकरी सहन करतील?" असं जयंत चौधरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हाणामारीत अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही बाजूच्या लोकांची समजूत काढण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
हरियाणाच्या कृषी मंत्र्यांनंतर आता काँग्रेसच्या महिला नेत्या विद्या देवी (Vidya Devi) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा" असं विद्या देवी यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांची मदत करा, पैसे वाटून किंवा दारू वाटून असं विद्या यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना महिला नेत्याची जेव्हा जीभ घसरली तेव्हा काँग्रेसचे आमदार सुभाष गंगोली यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विद्या देवी जींदच्या नरवानामधून काँग्रेसकडून विधानसभेसाठी उभा होत्या. विद्या देवी यांनी काँग्रेस जेव्हापासून निवडणूक हारलं आहे, तेव्हापासून पक्षाचं अस्तित्व संपलं आहे. आता हे आंदोलन कसंतरी उभं राहिलं असून आपल्याला प्रत्येक परिस्थितीत ते पुढे घेऊन जायचं असल्याचं म्हटलं आहे.
"अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?"
पंतप्रधान मोदींच्या आंदोलनजीवी टीकेवरही टिकैत यांनी हल्लाबोल केला असून एक प्रश्न विचारला आहे. राकेश टिकैत यांनी "अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. टिकैत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना असं म्हटलं आहे. यावेळी टिकैत यांना त्यांच्या अश्रूंबाबत देखील प्रश्न विचारला गेला. तेव्हा हे शेतकर्यांचे अश्रू आहेत, भीतीचे नाहीत. 26 जानेवारीला पोलिसांसमोर गुंड होते. ते लाठ्या चालवत होते. पोलिसांच्या बॅरिकेड्समध्ये लाठ्या घेऊन कोण आलं होतं हे पोलिसांनी सांगावं असं देखील म्हटलं आहे. शेतकरी आणि आपल्यात फक्त एका फोन कॉलचं अंतर आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी शेतकरी नेत्यांना चर्चेचं आवाहन केलं होतं. त्यावर देखील राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं. आम्ही कोणाशी चर्चा करायची. आम्हाला कोणताही प्रस्ताव मिळालेला नाही.