नवी दिल्ली- अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी केली होती. यशंवत सिन्हा यांच्या टीनेनंतर त्यांचां मुलगा आणि भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा मोदी सरकारच्या पाठिशी उभे राहिले आहेत. नोटाबंदी, जीएसटी, डिजिटल पेमेंट यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. देशातील जनतेला या निर्णयाचा लाभ मिळेल, अशा शब्दांमध्ये जयंत सिन्हा यांनी मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. जयंत सिन्हा यांनी वडिल यशवंत सिन्हा यांचे नाव न घेता त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखात देशाची अर्थव्यवस्था पारदर्शक झाल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर मोदी सरकारनं अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उपाय केल्याचा दावा जयंत सिन्हा यांनी केला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेविषयी अनेक लेख लिहिले गेले आहेत.पण हे सगळे लेख लहान तथ्यांवर आधारित आहेत. सरकारच्या नव्या धोरणांमुळे अर्धव्यवस्थेत सुधारणा होते आहे. सरकारने अनेक सुधारणा केल्या असून ज्याचा फायदा येणाऱ्या दिवसात लोकांना मिळणार आहे. नवी अर्थव्यवस्था ही नव्या भारतासाठी आहे. रोजगार निर्मिती, कुशल कामगार, जागतिक बाजारपेठेत भक्कम स्थान निर्माण करण्यासाठी अर्थव्यवस्थेत बदल आवश्यक होते, असं जयंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.त्याचबरोबर येत्या काळात देशातील नागरिकांना याचा फायदाच होणार असल्याचं जयंत सिन्हा म्हणाले.
नोटाबंदी, जीएसटीवरुन यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका केली होती. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, असा हल्लाबोल त्यांनी केला होता. या टीकेलाही जयंत सिन्हा यांनी उत्तर दिले. ‘अर्थव्यवस्थेच्या ढाच्यात बदल करुन नवा भारत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यामुळे लोकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नवी अर्थव्यवस्था पारदर्शक आणि जगासोबत चालणारी असेल. यामुळे लोकांचे जीवनमान उंचावेल. जीएसटी, नोटाबंदी आणि डिजिटल पेमेंटमुळे अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलेल,’ असंही जयंत सिन्हा यांनी त्यांच्या लेखात म्हंटलं आहे.
2018 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहचविण्याची योजना पूर्ण करण्याच्या भारत एकदम जवळ पोहचला आहे. ग्रामीण भागातील रस्ते 133 किलोमीटर प्रतिदिनच्या हिशोबाने बनविली जात आहेत. 2014 मध्ये 69 किलोमीटर प्रतिदिनाच्या हिशोबाने रस्ते बनवले जात होते. ही क्षमता आता दुप्पट झाली आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांनी केलेल्या टीका उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले होते यशवंत सिन्हा ?अरुण जेटली हे ‘सुपरमॅन’ आहेत, असे समजून वित्त मंत्रालयासह चार मोठ्या खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. परंतु कामाच्या प्रचंड बोजामुळे जेटली वित्त मंत्रालयास न्याय देऊ न शकल्याने त्यांनी देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातली, अशी सडेतोड टीका ज्येष्ठ भाजपानेते यशवंत सिन्हा यांनी केली. माजी केंद्रीय वित्तमंत्री राहिलेले सिन्हा पंतप्रधान मोदींच्या राजवटीत अडगळीत गेले आहेत. ‘इंडियन एक्स्प्रेस’ या दैनिकात, ‘आता मला बोलायलाच हवे,’ या शीर्षकाने लेख लिहून सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेची सद्य:स्थिती व ही अवस्था का आली, यावर परखड भाष्य केलं.
जेटली यांनी वित्तमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली, तेव्हा परिस्थिती खूपच अनुकूल होती. पण त्यांना हे काम झेपले नाही. वित्त मंत्रालयाचे काम मंत्र्याला अहोरात्र काम करूनही उरकणार नाही, एवढं असतं. यासाठी पूर्णवेळ व लक्ष देण्याची गरज असते. पण एकाच वेळी चार मंत्रालयांचे काम सांभाळणारे जेटली ते करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला याचा फटका बसणं अपरिहार्य असल्याचं भाकित करून सिन्हा म्हणतात, की अर्थव्यवस्था उभारण्यापेक्षा ती खिळखिळी करणे सोपे असते. निवडणूक प्रचारात थापा पचतात. पण एका रात्रीत अर्थव्यवस्थेला उभारी येईल, अशी जादुची कांडी कोणाकडेही नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था बाळसे धरू शकत नाही. अत्यंत कडवट भाषेत समारोप करताना सिन्हा लिहितात, की आपण गरिबी फार जवळून पाहिली, असे पंतप्रधान सांगतात. त्यांच्याप्रमाणेच सर्व भारतीयांनाही गरिबीचे चटके बसावेत, यासाठी त्यांचे वित्तमंत्री (जेटली) जिवाचे रान करीत आहेत!