कोल्हापूर/काेलकाता/पाटणा - कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मतांनी पराभव केला. जाधव यांना ९७,३३२ तर कदम यांना ७८,०२५ मते मिळाली. नोटाला १,७९९ मतदारांनी पसंती दिली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाल्याने ही पोटनिवडणूक झाली. रिंगणात तब्बल १५ उमेदवार असले तरी लढत दुरंगीच होती. तर पश्चिम बंगालसह बिहार, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या अनुक्रमे लोकसभेची एक तर विधानसभेच्या चार जागांसाठीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून तीन लाखांचे दणदणीत मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला तर बाबूल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. दोन्ही उमेदवारांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली.
सिन्हा पुन्हा संसदेतशत्रुघ्न सिन्हा यांनी आसनसाेल येथून भाजपच्या अग्निमित्रा पाॅल यांचा २ लाख ६४ हजार मतांनी पराभव केला. बाबूल सुप्रियाे यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली हाेती. बाबूल सुप्रियाे यांनी २०१९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर याठिकाणी विजय मिळविला हाेता.
बिहारमध्ये राजदबिहारच्या बाेचहांमध्ये राजदचे उमेदवार अमर पावसान यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६ हजार ६५८ मतांनी पराभव केला.
खैरागडमध्ये काँग्रेसछत्तीसगडमधील खैरागडमध्ये काँग्रेसच्या उमेदवार यशाेदा वर्मा यांनी भाजपाच्या काेमलसिंह जंघेल यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.