नवी दिल्ली - बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या आमदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमधील सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी काहीही काम करत नसल्याचा आरोप आमदार अमरनाथ गामी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोकऱ्या नाही. त्यामुळेच लोक बिहार सोडून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या आमदाराने राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीविरुद्ध सुरू केलेल्या यात्रेचे कौतुक केले आहे.
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अन्यथा लोक बिहार सोडून गेले नसते. तेजस्वी यादव बेरोजगारी हटाव यात्रा काढत आहेत. मात्र त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय बेरोजगारी हटविणे सोपे नाही. बिहारमधील कोणत्याच सरकारने बेरोजगारी समोर ठेवून काम केले नसल्याचे गामी यांनी सांगितले आहे.
याव्यतिरिक्त जदयूचे आमदार जावेद इकबाल अन्सारी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मागील 10-15 वर्षांपासून बेरोजगारीमुळे बिहारमधून अनेकजन पलायन करत आहेत. विरोधी पक्षांकडून 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढण्यात येत आहे. लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. तिथे त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे युवकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, असं सांगताना त्यांनी राजदच्या यात्रेचे समर्थन केले आहे.
राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.