राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सत्ता गमावल्यानंतर भाजपाचे आकाशात उडणारे 'तारे जमीं पर' येऊ लागल्याचं चित्र आहे. 'हम हम है, बाकी पानी कम है'च्या थाटात वावरणारी, मित्रांनाही दोन हात लांबच ठेवणारी मंडळी या मित्रांच्या हातात हात देताना दिसत आहेत. बिहारमध्ये एनडीएची झालेली बैठक आणि त्यात ठरलेला जागावाटपाचा फॉर्म्युला हा त्याचंच द्योतक म्हणावा लागेल. बिहारमधील ४० लोकसभा जागांपैकी भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी १७ जागा लढवणार आहेत, तर रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला (एलजेपी) सहा जागांची 'लॉटरी' लागली आहे. त्यासोबतच, त्यांना राज्यसभेची जागा देण्याचंही भाजपानं मान्य केलंय. हा फॉर्म्युला पाहता, पाच राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपाच्या मित्रांची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचं स्पष्ट दिसतंय. स्वाभाविकच, भाजपाचा सगळ्यात जुना मित्र असलेल्या शिवसेनेसाठी ही सुवर्णसंधीच मानली जातेय.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपानं २२ जागा जिंकल्या होत्या. नरेंद्र मोदींची लाट असूनही भाजपाला बिहारमध्ये ३० टक्क्यांहून कमी मतं मिळाली होती. हे गणित लक्षात घेता, यावेळची निवडणूक स्वबळावर लढणं भाजपासाठी धोक्याचं ठरलं असतं. कारण, यावेळी माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी वेगळी वाट धरली आहे. तसंच, तीन राज्यांमधील पराभवामुळे काँग्रेसला नवं बळ मिळालंय आणि महाआघाडीची घडी बसवण्याच्या प्रयत्नांनाही वेग आलाय. अशावेळी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांची साथ भाजपासाठी महत्त्वाची होती. म्हणूनच, पाच जागा कमी लढू, पण एकत्र लढू, असा सावध पवित्रा त्यांनी घेतला आहे. २००९च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसनं घवघवीत यश मिळवलं होतं; तेव्हा बिहारमध्ये भाजपा-जेडीयू जोडीनं ४० पैकी ३२ जागा जिंकण्याची किमया केली होती. तसाच चमत्कार मोदी - अमित शहा जोडीला यावेळीही अपेक्षित आहे आणि त्यासाठी ते दोन पावलं मागे यायलाही तयार झाल्याचं दिसतंय.
बिहारमध्ये झालेलं हे जागावाटप पाहता, भाजपाच्या नाडीचे वाढलेले ठोके ओळखून त्यांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न शिवसेना करू शकते. भाजपा-शिवसेना युतीतील वाद, कुरघोडी, शाब्दिक चकमकी रोज सुरू आहेत. शिवसेनेनं स्वबळाचा नाराही दिला आहे. तरीही, युती होणारच, शिवसेना आमच्यासोबत येईलच, असा विश्वास भाजपाश्रेष्ठी व्यक्त करताहेत. युतीसाठी काही फॉर्म्युले तयार केल्याचं सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये केलं होतं. दुसरीकडे, लोकसभा आणि विधानसभेचा फॉर्म्युला एकत्र ठरवला, तर युतीचा विचार करण्यास शिवसेना तयार असल्याचं समजतंय. आता 'बिहार फॉर्म्युल्या'च्या आधारे ते 'मोठ्या भावा'ला कसं खिंडीत गाठतात, हे पाहावं लागेल.