हरीश गुप्ता
नवी दिल्ली : झारखंड आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला जागा मिळाव्यात, अशी मागणी जदयूने केली आहे. त्यामुळे भाजप आणि जदयू या दोन पक्षांतील नाते सध्या ताणले गेले आहेत. या दोन राज्यांमध्ये अनुक्रमे डिसेंबर २०२४ आणि फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये निवडणुका होणार आहेत.
बिहारमध्ये एनडीए आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या जदयूला इतर राज्यांमध्ये आपला विस्तार करायचा आहे, जेणेकरून राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळख निर्माण होईल. दिल्लीतील निवडणुकांमध्ये जदयूचा उद्देश पूर्वांचल मतदारांना आकर्षित करणे हा आहे.
दिल्लीत हव्यात या चार जागा
जदयूला दिल्लीतील विधानसभा निवडणुकांमध्ये किमान १० जागांवर लढण्याची इच्छा आहे; परंतु ते चार जागांवर तयार होऊ शकतात.
जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद म्हणाले की, पक्षाने यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली आहे आणि पक्ष पुन्हा भाजपसोबत युती करील.
जेडीयूला बदरपूर, बुरारी, पालम आणि उत्तमनगर हे मतदारसंघ हवे आहेत. येथे पूर्वांचलच्या मतांचा निवडणूक निकाल ठरवण्यात मोठा प्रभाव आहे.
भाजप काही जागा सोडणार
हरयाणा निवडणूक निकालानंतर लगेचच झारखंड निवडणुकीची घोषणा होईल, असे सांगितले जाते. येथे भाजप आणि जदयू एकत्र लढणार असून, जदयूला तमाड आणि जमशेदपूर पूर्व मतदारसंघाची जागा देण्याची भाजपने तयारी केली आहे.
चिंता का आहे?
जदयूला झारखंड निवडणूक भाजप आणि एजेएसयूसोबत लढवायची आहे. भाजपने एजेएसयूसोबत चर्चा सुरू ठेवली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वतंत्रपणे लढून ८१ पैकी केवळ २५ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला होता. आता झारखंडमध्ये जदयूने जागा मागितल्याने भाजप नेते चिंतित आहेत.
बिहारसाठी विशेष राज्याचा दर्जा आणि पाटणा उच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिलेल्या कोटावाढीच्या निर्णयावर विशेष कायदा करण्याची मागणी जेडीयू करीत आहे.