नवी दिल्ली - जनता दल युनायटेडने पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य करणारे नेते प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पटना येथे पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नारायण सिंह म्हणाले की, प्रशांत किशोर आणि वर्मा हे गेल्या काही दिवसांपासून पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
प्रदेशाध्यक्षांनी उभय नेत्यांवर कारवाई करण्यासाठी जदयूचे प्रमुख आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी आपला मार्ग निवडला आहे. त्यामुळेच ते पक्षाच्या भूमिकेविरुद्ध वक्तव्य करत आहेत.
जदयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी सर्वप्रथम एनआरसीचा मुद्दा उचलला होता. नितीश कुमार यांना भेटून बिहारमध्ये एनआरसी लागू करू नये, हे समजावून सांगण्यात ते यशस्वी झाले होते. त्यानंतर किशोर यांनी नागरिकता संशोधन विधेयकाला देखील विरोध दर्शविला.
मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर मोदी सरकारच्या धोरणांवर सतत टीका करत आहेत. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीतून प्रशांत किशोर यांना वगळण्यात आले आहे. किशोर यांच्यासह पवन वर्मा यांनाही वगळण्यात आले आहे. दिल्लीत जदयू दोन जागांवर निवडणूक लढवत आहे.