“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 04:39 PM2024-01-31T16:39:06+5:302024-01-31T16:39:55+5:30
Congress Vs JDU: राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, असा पलटवार जदयूने केला आहे.
Congress Vs JDU: ममता बॅनर्जी यांच्यानंतर आम आदमी पक्षासह जदयूने इंडिया आघाडीपासून फारकत घेतली. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत थेट भाजपासोबत जाऊन सत्तांतर घडवले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर जदयू नेत्यांनी पलटवार केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमध्ये आहे. बिहारमधील शेतकरी आर्थिक अन्यायाचे बळी पडत आहेत. आम्ही त्यांच्या हितासाठी लढत राहू. नितीश कुमार थोडाही दबाव सहन करू शकत नाहीत. ते लगेचच घुमजाव करतात. दबाव आला की पारडे बदलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याला आता जदयू नेते ललन सिंह यांनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही
तुमच्या दबावाखाली बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात आली, असे तुम्ही म्हणता. इतके मोठे खोटे कुणी बोलू शकत नाही. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, नितीश कुमार कधीही कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. जातिनिहाय जनगणना हा नितीश कुमार यांचा निर्धार होता. जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा नितीश कुमार यांनी व्ही.पी.सिंह यांच्या कार्यकाळात मांडला होता. तेव्हा तर तुमचा राजकीय उदयही झाला नव्हता. असत्याचा आधार कायम घेत राहिलात तर पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही पप्पू आहात आणि पप्पू राहाल. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, या शब्दांत ललन सिंह यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या बंगळुरू आणि मुंबईतील बैठकीत जदयू पक्षाने ठराव मंजूर करायला सांगितला गेला, तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. तेव्हा तुम्ही गप्प राहून त्यांना पाठिंबा दिला. देशाच्या राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. यामुळेच तुमचा काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालला आहे, अशी टीकाही ललन सिंह यांनी केली.