JDU Vs Congress: एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू असून, दुसरीकडे बिहारमध्ये सत्ताबदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा आहे. नितीश कुमार राजीनामा देतील आणि भाजपासोबत सत्ता स्थापन करतील, असा दावा केला जात आहे. यातच जयदू पक्षाच्या एका नेत्याने राहुल गांधी यांना टोला लगावत सल्ला दिला आहे.
मीडियाशी बोलताना जदयू नेते नीरज कुमार म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांना भारत जोडो न्याय पदयात्रा काढण्याचा अधिकार आहे. या यात्रेचे फलित म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ही यात्रा पोहोचल्यावर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाजूला झाल्या. आता ही यात्रा बिहारमध्ये दाखल होणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक राजकीय घडामोडी बदलत आहेत. साहजिकच राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करायला हवे. त्यांच्या रणनीतीत कुठे चूक झाली की, ते जिथे जातात तिथे त्यांचे मित्रपक्ष साथ सोडून जातात, असे नीरज कुमार यांनी म्हटले आहे.
पुढे जे होईल, त्याचा सामना केला जाईल
बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी यांनी भाष्य केले. आता जनताही असे म्हणत आहे की, त्यांनी असे पलटीमार सरकार पहिल्यांदाच पाहिले आहे. आता काही होईल, ते सर्व जनता पाहील. नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यावर १५ महिन्यांचे काम कोणीही विसरू शकत नाही. ही आमची उपलब्धी आहे. पुढे काहीही झाले तरी त्याचा सामना केला जाईल, असेही मृत्युंजय तिवारी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यास ते विक्रमी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होतील. नितीश कुमार यांच्यासह अनेक मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे. भाजपच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री होऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका उपमुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेत्या रेणू देवी यांचे नाव निश्चित मानले जात आहे, तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर विचारमंथन सुरू आहे.