जेडीयू आमदार गोपाल मंडल आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, यावेळी गोपाल मंडल आपल्या नव्या कारनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, हातात पिस्तुल घेऊन ते भागलपूरच्या हॉस्पिटलमध्ये फिरताना दिसले. गोपाल मंडल आपल्या ओळखीच्या रुग्णाला पाहण्यासाठी मायागंज येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यावेळी ते हातात परवाना असलेले पिस्तुल घेऊन येथे फिरत होते. हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये गोपाल मंडल यांनी रुग्णाची भेटली. त्यानंतर ते आपल्या सुरक्षा रक्षकासह हातात पिस्तुल घेऊन परत गेले.
पिस्तुल घेऊन हॉस्पिटलमध्ये फिरताना गोपाल मंडल म्हणाले की, माझ्या जीवाला धोका आहे आणि माझे अनेक राजकीय शत्रू आहेत. त्यामुळे मी पिस्तुल घेऊन आलो होतो. तसेच, माझ्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे, असेही गोपाल मंडल म्हणाले. दरम्यान, गोपाल मंडळ यांच्यासोबत नेहमीच सुरक्षा कर्मचारी असतात. तसेच, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्येही सुरक्षा कर्मचारी शस्त्रांसह त्यांच्यासोबत असतात. मग, एका आमदाराला हातात पिस्तुल घेऊन खुलेआम फिरण्याची गरज का वाटली? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गोपाल मंडल आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. दोन वर्षांपूर्वी पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या तेजस राजधानी एक्स्प्रेसमध्ये ते चड्डी आणि बनियान घालून फिरताना दिसले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रवास करणारे प्रवासी प्रल्हाद पासवान यांनी प्रश्न उपस्थित केला असता गोपाळ मंडल यांनी दमदाटी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर, पीडित प्रल्हाद पासवान, जे जेहानाबादच्या हुलासपूर पोलिस स्टेशन परिसरात राहणारे होते, त्यांनी नवी दिल्लीच्या जीआरपी पोलिस ठाण्यात आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.