पाटणा - बिहारच्या पाटण्यातील राजेंद्र नगरहून राजधानी दिल्लीकडे जाणाऱ्या तेजस राजधानी एक्सप्रेसमधील आमदार महोदयांच्या कृत्यामुळे जेदयु पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. अंगावरील कपडे काढून फक्त अंडरवेअर आणि बनियानवरच हे महाशय ट्रेनमध्ये इकडून तिकडे फिरत होते. गोपाल मंडल असे या आमदार महोदयांचे नाव असून त्यांच्या या वर्तणुकीला अनेकांना आक्षेप घेतला आहे. रेल्वेतील प्रवाशांनीही त्यांच्या या वागणुकीला विरोध केला होता.
गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर आणि बनियानवर फिरत असताना बोगीतून इतर प्रवाशांनी त्यांना टोकलं होतं. त्यावेळी, आमदारांनी प्रवाशांसोबतच बाचाबाची केली, त्यांना अरेरावी केली. प्रवासी आणि आमदार यांच्यातो गोंधळ झाला. त्यामुळे, एक्सप्रेमधील रेल्वे पोलीस फोर्सच्या जवानांनी संबंधित बोगीत धाव घेतली. आरपीएफ पोलिसांनी हा वाद सोडवला. दिलदारनगर स्टेशन सुटल्यानंतर ही घटना घडल्याचे आरपीएफने सांगितले.
दरम्यान, तेजस राजधानी एक्सप्रेसच्या ए-1 बोगीतील सीट नंबर 13,14 आणि 15 वर गोपाल मंडल प्रवास करत होते. तर, जहानाबादचे रहिवाशी असलेले प्रल्हाद पासवान हे आपल्या कुटुंबीयांसमेवत ए-1 कोचमध्येच सीट नंबर 22-23 वर होते. पाटणा ते नवी दिल्ली रेल्वेस्थानक असा या दोघांचाही प्रवास होता. त्यावेळी, गोपाल मंडल हे रेल्वेच्या बोगीतच कपडे काढून अंडरवेअर आणि बनियानवर टॉयलेटसाठी गेले होते. ज्यावेळी ते वापस आले तेव्हा प्रल्हाद यांन त्यांना टोकले. बोगीत महिला प्रवासी असल्याचेही सांगितले. मात्र, गोपाल मंडल हे ऐकायला तयारच नव्हते, याउलट त्यांनी मोठा गोंधळ केला. त्यामुळे, रेल्वेतील आरपीएफ पथकाने पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शनच्या रेल्वे पोलिसांना सूचना दिली. जेव्हा रेल्वे स्टेशनवर पोहोचली, तेव्हा युपी पोलिसांनी तेथे धाव घेतली होती.
माझं पोट दु:खत असल्याने मी केवळ अंडरवेअर आणि बनलेवर फिरत होतो, असे स्पष्टीकरण आमदार गोपाल मंडल यांनी यांनी दिले आहे. विशेष म्हणजे मी खोटं बोलत नाही, असेही ते म्हणाले.