नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयश आलं होतं. त्यामुळे नरेंद्र मोदींना एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावं लागलं आहे. केंद्रातील बदलेल्या परिस्थितीमुळे १२ खासदार असलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि जेडीयूच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा दिल्लीत येत असून, ते राजधानी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनता दल युनायटेडच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नितीश कुमार हे अनेक नेत्यांसह पाटणा येथून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
दिल्लीमध्ये जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जेडीयूचे बिहारमधील नेते दिल्लीमध्ये दाखल होत आहेत. याबाबत माहिती देताना मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीत देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबतची रणनीती निश्चित केली जाईल.
बिहार सरकारमधील मंत्री मदन साहनी यांनी जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी पाटणा येथून रवाना होण्यापूर्वी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरची ही पहिली बैठक आहे. संघटनेच्या दृष्टीने ही मोठी बैठक आहे. यामध्ये काही मोठे निर्णय घेतले जातील. मात्र या बैठकीत नेमके काय निर्णय घेतले जातील, याबाबत सध्या काही बोलणं योग्य ठरणार नाही.
मदन सहानी यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते अश्विनी चौबे यांनी बिहारमधील पुढील सरकार आणि मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावरही प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनी चौबे सध्या ना खासदार आहेत, ना मंत्री आहेत. ते काहीही बोलू शकतात. बिहारमधील पुढील सरकार आणि मुख्यमंत्र्याबाबत एनडीए निर्णय घेईल. कुठल्या एका नेत्याच्या सांगण्यावरून काही होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.