Narendra Modi : संसद भवनात शुक्रवारी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएमधील पक्षांनी नरेंद्र मोदींच्या यांच्या नावाच्या पंतप्रधान पदाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, एकनाथ शिंदे, चिराग पासवान यांच्यासह एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी देशाच्या पुढील पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दिला. या बैठकीत नितीश कुमार यांच्या भाषणाने संपूर्ण सभागृह हशा पिकला होता. नितीश कुमार यांनी सभेला संबोधित करताना मी पूर्णपणे तुमच्यासोबत असल्याचे सांगितले.
संसदेत एनडीएच्या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांचे संसदीय नेतेपदी निवड झाली. राजनाथ सिंह यांनी याबाबत प्रस्ताव मांडला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांनी यासाठी अनुमोदन केले. तसेच जेडीयुचे नेते नितीश कुमार यांनी सुद्धा या प्रस्तावाला पाठिंबा दिला. नरेंद्र मोदी जे काही कराल ते चांगले कराल. नरेंद्र मोदींनी देशाचा खूप विकास केला आहे. बिहार अजून बाकी आहे. त्याच्या बाबतीतही असेच घडेल, असेही नितीश कुमार म्हणाले. नितीश कुमार यांच्या या भाषणानंतर संपूर्ण सभागृहात हशा पिकला. यासोबत नरेंद्र मोदीही हसताना दिसले.
काय म्हणाले नितीश कुमार?
"आमचा पक्ष जनता दल युनायटेड (जदयू) भाजप संसदीय नेते नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी समर्थन देत आहे. आज हा आनंदाचा क्षण आहे. दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत आणि आता पुन्हा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी सगळ्या देशाची सेवा केली आहे. आता पूर्ण विश्वास आहे की राज्यांचे जे काही बाकी आहे ते पूर्ण करतील. आम्ही पूर्णपणे सर्व दिवस मोदींसोबत राहू. आज जे काही ते करत आहे तू खूप चांगले आहे. यावेळी इकडे तिकडे काही जण जिंकले आहेत. आम्हाला तर वाटतंय की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा याल तेव्हा सगळेच पराभूत होतील.एवढ्या निरर्थक गोष्टी बोलून तुम्ही काय केले? त्यांनी काही काम केले का? देशाची सेवा केली का? पण मोदींनी एवढे काम केले आहे. आता तुम्हाला संधी मिळाली आहे तर भविष्यात त्या लोकांना वाव राहणार नाही. सगळं संपूण जाईल. देश पुढे जाईल आणि बिहारमध्ये जी कामे उरली आहेत तीही आता पूर्ण होतील. तुम्हाला जे हवंय त्या कामासाठी आम्ही सोबत राहू. सगळे एकत्र येऊन खूप चांगल्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडत आहे. आपण एकत्र मिळून पुढे जाऊ. माझा आग्रह आहे की तुमचा लवकरात शपथविधी व्हावा. आमची इच्छा होती की आजचं व्हावं पण तुम्ही रविवारी करणार आहात. सगळे तुमच्या नेतृत्वात काम करतील," असे नितीश कुमार म्हणाले.
दरम्यान, ६० वर्षांनंतर कोणीतरी सलग तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान होत आहे, असे म्हणत अमित शहा यांनी सर्वांचे आभार मानले. नितीन गडकरींनीही नरेंद्र मोदींचे कौतुक करून प्रस्तावाला सुरुवात केली. "नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारताचा सर्वांगीण विकास झाला आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे लढाऊ पंतप्रधान राहिले आहेत आणि त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी परिश्रमपूर्वक काम केले आहे," असे गडकरी म्हणाले.