KC Tyagi Resigned : जेडीयू अर्थात जनता दल संयुक्त पक्षाचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी अचानक राष्ट्रीय प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यागींनी राजीनामा दिल्यानंतर राजीव रंजन यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे महासचिव आफाक अहमद खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याची माहिती दिली. पण, या घडामोडीनंतर के.सी. त्यागी यांच्या राजीनाम्याची वेगळीच कारणे चर्चेत आली आहेत.
त्यागी यांनी राजीनामा दिल्यानंतर जदयूकडून राजीव रंजन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यागींनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले असले, तरी वेगळीही कारणे या मागे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
त्यागींची विधाने, पक्षात वाद
जदयूचा प्रमुख चेहरा असलेले के.सी. त्यागींनी गेल्या काही काळात अशी विधाने केली, जी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधी वा वेगळी होती. पक्ष नेतृत्वाशी वा पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा न करताच त्यागींकडून विधाने करण्यात आली. त्यामुळे जदयूमध्ये मतभेद तयार होऊन सु्प्त संघर्ष सुरू झाला होता. ही परिस्थिती हळूहळू गंभीर बनत गेली.
एनडीए-जदयूतील मतभेदाचे बनले कारण
त्यागी यांनी केलेल्या विधानामुळे केवळ जदयूमध्येच मतभेद तयार झाले नाही, तर त्याचा परिणाम एनडीएवरही होऊ लागला होता, अशी चर्चा आहे. परकीय धोरणाच्या मुद्द्यावर त्यागींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या सूरात सूर मिसळला होता. इस्रायलला शस्त्र पूरवठा थांबवण्याच्या एका संयुक्त निवेदनावर त्यांनी स्वाक्षरीही केली होती. यामुळे जदयूमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि अंतर्गत कलह वाढू लागला होता.
त्यागी यांनी वैयक्तिक मतेही पक्षाची मते म्हणून मांडल्याचे आणि त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला, तसेच पक्ष नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यागी यांच्याकडून मांडल्या जाणाऱ्या भूमिकांमुळे पक्षाची सातत्याने अडचण होऊ लागली होती, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
राजीव रंजन बनले जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ते
त्यागी यांनी राजीनामा दिल्यानंतर राजीव रंजन यांना राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. राजकीय अभ्यासकांच्या मते त्यागी यांना हटवून जदयूमधील अंतर्गत मतभेदाची स्थिती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, जेणेकरून पक्ष एकजूट राहावा.