नवी दिल्ली - बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान जनता दल युनायटेडच्या एका आमदाराने केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दरभंगामधील कुशेश्वरस्थानचे जेडीयूचे आमदार आणि सध्या उमेदवार असलेले शशि भूषण हजारी यांनी बिहारच्या जनतेबद्दल एक विधान केलं असून सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "रोजगारासाठी नाही तर हौस पूर्ण करण्यासाठी बिहारमधील लोक हे मुंबई-दिल्लीला जातात" असं शशि भूषण हजारी यांनी म्हटलं आहे.
"माझ्या मतदारसंघामध्ये दरवर्षी पुराची समस्या असते. मात्र येथील लोक कामाच्या शोधात इतर राज्यामध्ये जात नाहीत" असा दावा हजारी यांनी केला आहे. मात्र बिहारमधील काही ठिकाणचे लोक हे फक्त हौस म्हणून राज्याबाहेर जातात असं हजारी यांनी व्हिडीओमध्ये म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावरून निशाणा साधला आहे. दुसऱ्या राज्यांमध्ये रोजगाराच्या शोधात जाणाऱ्या बिहारी मजुरांऐवढेच पैसे गावातील मजुरांना मिळतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
"बिहारमधील लोक हे हौशी असतात"
शशि भूषण हजारी यांनी येथे कामाची कोणतीही कमतरता नसल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच ज्यांना काम मिळत नाही त्यांना मनरेगाचं काम दिलं जातं असा दावा देखील त्यांनी केला आहे. 'बिहारमधील लोक हे हौशी असतात. त्यामुळे दोन ते चार महिने येथे पुराचा त्रास असतो तेव्हा मुंबई-दिल्ली फिरुन होईल आणि रोजगारही मिळेल असा विचार करुन ते जातात. काहीजण तर पुराच्या काळात केवळ फिरण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जातात. मात्र पूर ओसरल्यावर शेतीच्या कामांसाठी पुन्हा बिहारमध्ये येतात' असं देखील हजारी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सणसणीत टोला लगावला. "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे ते माझ्याबाबतीत जे काही बोलतील ते माझ्यासाठी आशीर्वादाप्रमाणेच आहेत" असं म्हणत तेजस्वी यादव यांनी निशाणा साधला. तेजस्वी यादव यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "नितीश कुमार यांनी माझ्याबाबत कोणतेही अपशब्द उच्चारले तरी माझ्यासाठी तो आशीर्वाद आहे. नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले आहेत. त्यामुळे जे मन करेल किंवा ते काहीही बोलले तरी त्यांची प्रत्येक गोष्ट मी आशीर्वाद म्हणून घेतो. यावेळी बिहारने ठरवलं आहे. रोटी-रोजगार आणि विकासाच्याच मुद्दयावर निवडणुका पार पडणार" असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून ते नितीश कुमारांवर हल्लाबोल करत आहेत.