PM Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ला बहुमत मिळाले. काल नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही चांगली कामगिरी केली. काँग्रेसने ९९ जागांवर विजय मिळवला. एनडीए'चे सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांना महत्वाची पद दिली जातील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, सध्या लोकसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत.
या सरकारमध्ये किंगमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पक्ष टीडीपी आणि जेडीयू या दोन्ही पक्षांनी भाजपकडे लोकसभेच्या अध्यक्षपदाची मागणी केल्याचे बोलले जात आहे. तर, दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्षपद दुसऱ्या कोणत्याही पक्षाला भाजप द्यायला तयार नसल्याचे बोलले जात आहे.
टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार या दोन्ही नेत्यांची लोकसभा अध्यक्षपदाकडे लक्ष आहे. गेल्या काही वर्षांत सत्ताधारी पक्षांतर्गत बंडखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे पक्षांतर्गत फूट पडली आहे आणि अनेक ठिकाणी राज्य सरकारेही पडली आहेत, यामुळे लोकसभा अध्यक्षपद महत्वाचे मानले जाते.
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
दरम्यान, पक्ष फूटीमध्ये किंवा सदस्यांच्या फुटीमध्ये पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो आणि हा कायदा सभागृहाच्या अध्यक्षांना जास्त आहे. कायद्यानुसार, पक्षांतराच्या कारणास्तव सदस्यांना अपात्र ठरवण्यासंबंधीच्या प्रकरणांवर निर्णय घेण्याचा अधिकार सभागृहाच्या अध्यक्षांना आहे. त्यामुळे या पदावर दोन्ही नेत्यांचे डोळे लागले आहेत.
लोकसभेचे अध्यक्षपद का महत्वाचे ?
लोकसभेचे अध्यक्षपद हे खूपच गुंतागुंतीचे असते, सभागृह चालवण्यासाठी सभापती पद हे पक्षविरहित मानले जाते, पण निवडणूक जिंकल्यानंतर फक्त एका विशिष्ट पक्षाच्या प्रतिनिधीकडेच हे पद असते. अध्यक्षांना सभागृहामध्ये अनेक अधिकार असतात, यामुळे सरकार टीकवण्यात या पदाचा महत्वाचा वाटा असतो.
नेहरुंप्रमाणेच मोदीही तिसऱ्यांदा पंतप्रधान
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात भारतीय जनता पक्षाने २४० जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर तेलुगू देसम पक्षाने १६ तर जनता दल युनायटेडने (जेडीयू) १२ जागा जिंकल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच नरेंद्र मोदीही सलग तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत. नरेंद्र मोदींसोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, जेपी नड्डा, एस जयशंकर आणि शिवराज सिंह चौहान यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली.