मोदी सरकारने लोकसभेत वक्फ बोर्ड दुरुस्ती संशोधन विधेयक आणले आहे. या विधेयकाला जेडीयू नेते ललन सिंह यांनी समर्थन दिले. दरम्यान, ललन सिंह यांनी काल सोमवारी पाटणा येथे मुस्लिम नेत्यांची भेट घेतली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
या भेटीनंतर जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, जेडीयूचे प्रतिनिधी या विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीमध्ये मुस्लिमांच्या चिंता मांडतील. सुपौलचे खासदार दिलेश्वर कामैत हे ३१ सदस्यीय जेपीसीमध्ये जेडीयूचे सदस्य आहेत. समितीची पहिली बैठक झाली असून त्यात विरोधी पक्षांनी वक्फ बोर्डात बिगर मुस्लिमांच्या नियुक्तीला एकमताने विरोध केला आहे. पहिल्या बैठकीत कामईत म्हणाले होते की, जेडीयू या विधेयकाबाबत चिंतित असलेल्या मुस्लिमांशी बोलत आहे, त्यामुळे पुढील बैठकीत ते आपले म्हणणे मांडतील.
"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल
लोकसभेत या विधेयकावर बोलताना ललन सिंह म्हणाले होते की, विरोधक गुरुद्वारा आणि मंदिराचे उदाहरण देत आहेत पण वक्फ हे धार्मिक स्थळ नसून संस्था आहे. सरकार धर्मात ढवळाढवळ करत नाही, पण संस्थेत भ्रष्टाचार असेल तर हस्तक्षेप का करू शकत नाही, असं ललन सिंह म्हणाले होते. जेडीयू कोट्यातून केंद्रीय मंत्री ललन सिंह यांच्या वतीने वक्फ विधेयकाच्या बचावासंदर्भात काही मुस्लिम संघटनांच्या नेत्यांनी पाटणा येथे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली होती. नितीश कुमार यांच्यासमोर जेडीयूच्या भूमिकेवर मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि विधेयकावर त्यांचे आक्षेप नोंदवले होते. नितीश कुमार यांनी मुस्लिमांना काहीही चुकीचे घडू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले होते.
नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार ललन सिंह यांनी सोमवारी पाटणा जेडीयू कार्यालयात शिया आणि सुन्नी बोर्डाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह म्हणाले की, दोन्ही मंडळांच्या अध्यक्षांनी कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीबाबत सविस्तरपणे आपली मते मांडली. ते म्हणाले की, नितीश कुमार नेहमीच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आणि कल्याणासाठी काम करत आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताला धक्का पोहोचू दिला जाणार नाही. मंत्री विजय चौधरी, जामा खान, महासचिव मनीष वर्मा, शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अफजल अब्बास आणि सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष मोहम्मद इर्शादुल्ला या बैठकीत उपस्थित होते.