पाटणा - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली असून, पुरेशी मंत्रिपदे न मिळाल्याने मंत्रिमंडळात सहभागी न झालेल्या नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने भाजपाला आज अजून एक धक्का दिला आहे. भाजपाशी असलेली आघाडी केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवताना बिहारबाहेर सर्व ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा जेडीयूने केली आहे.जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक आज पाटणा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर जेडीयूने एनडीएतील आपल्या सहभागाबाबत मोठी घोषणा केली आहे. भाजपासोबतची एनडीएमधील आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित ठेवण्याची आणि बिहारबाहेर एनडीएचा घटक पक्ष म्हणून काम न करण्याची घोषणा जेडीयूने केली. त्यामुळे जेडीयू आणि भाजपाची आघाडी ही केवळ बिहारपुरती मर्यादित राहणार आहे. तर बिहारबाहेर जेडीयू स्वबळावर निवडणुका लढणार आहे. आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका होणाऱ्या जम्मू काश्मीर, झारखंड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यात जेडीयू स्वबळावर लढणार आहे.
जेडीयूकडून भाजपाला अजून एक धक्का; बिहारबाहेर स्वबळावर लढण्याची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 2:59 PM