अहमदाबाद - गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक रूप घेतले असून, स्थानिकांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे हजारो उत्तर भारतीयांनी पलायन केले आहे. आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले असून, या हल्ल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या मनात बिहारील नागरिकांविषयी एवढा द्वेष का आहे, असा सवाल जेडीयूने या पत्रामधून केला आहे. भाजपानेही या हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. काँग्रेस एका रणनीतीनुसार ठरवून हिंसाचार घडवत असून, काँग्रेसचे नेते देशाचे विभाजन करण्याच्या कार्यात गुंतले आहेत. गुजरातमधील हिंसाचार हा अल्पेश ठाकोर यांची सेना करत आहे, असा आरोप भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी केला आहे. मात्र ठाकोर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र या हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला आहे. गुजरातमध्ये होत असलेल्या हिंसाचाराकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी या हिंसाचारावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. 28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने 14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली. त्यातून उत्तर भारतीयांवर हल्ले होत असून, अनेक उत्तर भारतीय कुटुंबांनी राज्यातून पलायन केले आहे. उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 342 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिली आहे.
उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, भाजपा-जेडीयूचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 2:01 PM