नवी दिल्ली - जदयू पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार आज दिल्लीतील राष्ट्रीय कारणीच्या बैठकीला संबोधित करत आहेत. आगामी 2019 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्व आहे. याच बैठकीत लोकसभा निवडणुकांसाठी नितिशकुमारांकडून जयदूची रणनीती आखण्यात येईल. तर भाजपसोबत सुरु असलेल्या अंतर्गत कलहामुळेही या बैठकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
जदयूचे सुप्रिमो नितिशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना सोडचिठ्ठी देऊन भाजपशी संसार थाटला. भाजपनेही जदयूला पाठिंबा देत नितिशकुमार यांना मुख्यमंत्री केले. मात्र, लवकरच या संसाराचा काडीमोड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एनडीए आघाडीत जागावाटपावरुन नितिशकुमारांचे बिनसले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच नितिशकुमार पुन्हा काँग्रेस आणि राजदशी आघाडी करतील असाही अंदाज लावला जात आहे. मात्र, जदयूतील वरिष्ठ नेत्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. शनिवारी नितिशकुमार आणि जदयू नेत्यांच्या झालेल्या बैठकीत बिहारमध्ये एनडीएचा प्रमुख चेहरा नितिशकुमार हेच असतील, असे ठामपणे सांगण्यात आले. तसेच जदयू मोठ्या भावाची भूमिका निभावेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे जदयूच्या आज दिल्लीत होत असलेल्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीवर सर्वांच्या नजरा लागून लागल्या आहेत. तर जदयूचा प्रस्ताव भाजप मान्य करणार का ? भाजप आणि जदयूचे लोकसभा निवडणुकांतील जागावाटपासाठी एकमत होणार का हा खरा प्रश्न आहे.