- एस. पी. सिन्हापाटणा : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवित सत्तास्थापनेसाठी सज्ज असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्षांकडून अटी व शर्ती मांडायला सुरुवात केली आहे. महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेसह प्रस्तावित समान नागरी कायद्याच्या (यूसीसी) अंमलबजावणीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी एनडीएचा घटक पक्ष असलेल्या जदयुने केली आहे.
निवडणुकीदरम्यान अग्निपथ योजनेबाबत मतदारांमध्ये बरीच नाराजी दिसली. त्यातील त्रुटी दूर करण्याची, तसेच समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्वांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी जदयुचे नेते के.सी. त्यागी यांनी केली. समान नागरी कायद्याबद्दल आमची पूर्वीची मते कायम आहेत.
याबाबत आमच्या पक्षाचे नेते नितीश कुमार यांनी विधि आयोगाच्या अध्यक्षांना पत्रही दिले आहे. आम्ही यूसीसीच्या विरोधात नाही; परंतु केंद्र सरकारने त्यावर तोडगा काढावा. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची आमची मागणी असल्याचे जदयुने म्हटले आहे.