नवी दिल्ली - इंजिनीअरिंग व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची जेईई व नीट या परीक्षा आता जुलैऐवजी सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. जेईई मुख्य परीक्षा १ सप्टेंबर ते ६ सप्टेंबरमध्ये होतील आणि परीक्षांचे निकाल सप्टेंबरच्या अखेरीस लागणार आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (एमबीबीएस, बीडीएस) नीट परीक्षा १३ सप्टेंबर रोजी होणार असून, तिचा निकाल ऑक्टोबर महिन्यात लागेल. मात्र, देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, या परीक्षाही पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेस नेते व खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.
लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे. सप्टेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसार होणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात अशी मागणी चौधरी यांनी या पत्राद्वारे केली आहे. देशातील कोरोनाबाधितांची वाढती लोकसंख्या आणि कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता, विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यात यावा. या महामारीच्या संकटात केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही, तर मानसिकदृष्ट्याही तयार नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, या परीक्षा पुढे ढकल्यात याव्यात, असे अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलंय.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 लाख पार झाली आहे. तर, दिवसाला 70 हजार नवीन रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट अद्याप गडद असून ते टळलेले नाही. या परिस्थिती विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे धोकादायक आहे. त्यामुळे, पुढील महिन्यात होणाऱ्या या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याखेरीज आयआयटीमधील प्रवेशासाठी जी जेईई अॅडव्हान्स परीक्षा होते, ती आता २७ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे. जेईई मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शहरातील परीक्षा केंद्र निवडणे शक्य होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई मुख्य, जेईई अॅडव्हान्स आणि नीट परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा केली होती. ते म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन सूचनांचे पालन करून परीक्षा घेतल्या जातील. मात्र, या परीक्षांवरही सध्या कोरोनाचे सावट आहे.