नवी दिल्ली : सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. यंदा पहिल्यांदाच जेईईचा कटऑफ खूप घसरल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला आला आहे. तर पुण्याचा शरद भट देशात 31वा तर अर्णव दातार 41वा आला.जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या तीन विषयांचा 360 गुणांची परीक्षा 8 एप्रिल रोजी घेण्यात आली होती. सोमवारी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेचा कटऑफ सर्वसाधारण गटासाठी 74, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) 45, अनुसूचित जाती (एससी) 29, अनुसूचित जमाती (एसटी)24 असा घसरला आहे. जेईई मेन्सचे तिन्ही पेपर खूपच अवघड काढण्यात आले असल्याने हा कट ऑफ खाली आहे.जेईई मेन्स परीक्षेसाठी देशभरातून 10 लाख 46 हजार विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 2 लाख 24 हजार विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत पुण्यातील शरद भट 31वा, अर्णव दातार 41वा, अनुज श्रीवास्तव या विद्यार्थ्यांने 66वा, चिन्मय भारती या विद्यार्थ्याने 197वा रँक प्राप्त केला आहे.जेईई परीक्षांचे मार्गदर्शक दुर्वेश मंगेशकर यांनी सांगितले,‘‘जेईईच्या रसायनशास्त्र, गणित हे दोन पेपर खूपच अवघड होते. त्यातील प्रश्न दिलेल्या ३ तासांच्या वेळेत सोडविणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नव्हते. त्यामुळे अनेकांना पेपर पूर्ण सोडविता आला नव्हता. त्यामुळे गेल्या 16 वर्षात जेईई निकालाचा कटऑफ पहिल्यांदाच इतका खाली घसरला आहे.’’ महाराष्ट्रातून दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली होती, त्यापैकी 30 हजार विद्यार्थी पुण्यातील होते. त्यापैकी 1 हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.-------------------------सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहेजेईई मेन्स परीक्षेमध्ये पुण्याचा अर्णव दातार देशात 41वा आला आहे. त्याला सॉफ्टवेअर इंजिनीअर व्हायचे आहे. त्याचे वडील कॉग्निझंट कंपनीत नोकरीला आहेत तर आई टाटा रिसर्च इन्टिट्यूटमध्ये कार्यरत आहे. परीक्षेच्या तयारीसाठी त्याने दिवसातून 6 ते 7 तास अभ्यास केला. तो अरिहंत कॉलेजचा विद्यार्थी आहे.
जेईई निकाल जाहीर, सुरज कृष्णा देशातून प्रथम, तर पुण्याचा शरद भट देशात 31वा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 9:54 PM