श्रीहरीकोटा : खगोलशास्त्राला समर्पित असलेल्या आणि ब्रह्मांडाबद्दलची आपली समज अधिक विकसित करण्याच्या ध्येयावर आधारित ‘अॅस्ट्रोसॅट’ या आपल्या पहिल्या अंतराळ संशोधन वेधशाळेचे भारताने सोमवारी श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणामुळे भारत अंतराळात वेधशाळा ठेवणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. श्रीहरीकोटा येथून ‘पीएसएलव्ही-सी३०’द्वारे सकाळी १० वाजता प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘अॅस्ट्रोसॅट’ने आपल्या समवेत सहा विदेशी उपग्रहदेखील अंतराळात नेले. त्यात चार अमेरिकन उपग्रहांचा समावेश आहे. अमेरिकन उपग्रह प्रक्षेपित करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. हे उपग्रह सॅन फ्रान्सिस्कोच्या एका कंपनीचे आहेत आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेच्या (इस्रो) व्यावसायिक शाखा असलेल्या एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत झालेल्या करारानुसार त्यांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. इस्रोने महत्त्वाकांक्षी आणि कमी खर्चाच्या अंतराळ कार्यक्रमात आणखी एक पाऊल टाकताना ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाद्वारे (पीएसएलव्ही) ‘अॅस्ट्रोसॅट’ आणि अन्य सहा विदेशी उपग्रहांना श्रीहरीकोटाच्या सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपण केल्याच्या २५ मिनिटानंतर भूस्थिर कक्षेत स्थापित केले. पीएसएलव्हीचे प्रक्षेपण होताच इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला. पीएसएलव्हीचे हे ३१ विक्रमी उड्डाण होते. ‘अॅस्ट्रोसॅट’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार उत्साहात म्हणाले, ‘पीएसएलव्हीने शास्त्रज्ञांच्या समुदायासाठी नवी माहिती घेऊन येणाऱ्या अंतराळ विज्ञानाची अशी एक मोहीम यशस्वी केली आहे,ज्यावर केवळ भारताच्याच नव्हेतर अवघ्या विश्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. मी समस्त इस्रो समूहाचे त्यांनी केलेल्या या शानदार कामाबद्दल अभिनंदन करतो.’ (वृत्तसंस्था)--------------‘नासा’हून एक पाऊल पुढेपीएसएलव्ही-सी३० ने १५१३ किलो वजनाच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ला आधी ६५० कि.मी. उंचीवरील भूस्थिर कक्षेत नेऊन सोडले. हा उपग्रह पृथ्वीला ६५० कि.मी.वरून प्रदक्षिणा घालणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून अवकाशातील हालचालींचा वेध घेणे शक्य होणार आहे. इतकेच नव्हे तर अवकाशातील अतिनील, कमी आणि उच्च क्षमतेच्या लहरी, कृष्णविवरसारख्या विविध हालचालींवर एकाच वेळी लक्ष ठेवता येणार आहे. अशा प्रकारे बहुद्देशीय अभ्यास करणारा हा पहिलाच उपग्रह असल्यामुळे या अभ्यासात इस्रो नासापेक्षा एक पाऊल पुढे राहणार आहे. या उपग्रहातील ‘सॉफ्ट एक्स रे टेलिस्कोप’, ‘लार्ज एरिया एक्स रे प्रोपरशनल काऊंटर’ आणि कॅडमियम झेनिक टेल्युराइड इमेजर’ उपकरणे मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टीआयएफआर) वैज्ञानिकांनी विकसित केलेले आहेत. याबरोबरच इस्रोद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेल्या जागतिक ग्राहकांच्या उपग्रहांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. या जागतिक ग्राहकांत जर्मनी, फ्रान्स, जपान, कॅनडा, ब्रिटनसह २० देशांचा समावेश आहे. ---------श्रीहरीकोटा : येत्या ३-४ वर्षांत खासगी उद्योगांनी तयार आणि जुळवणी केलेले प्रक्षेपण यान पुढे येण्याची आशा आहे, असे सांगून भारताच्या अंतराळ कार्यक्रमात स्वदेशी उद्योगांनी अधिक सक्रिय भागीदारी द्यावी, असे आवाहन इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार यांनी केले आहे.‘येत्या ३-४ वर्षांत उद्योगांनी बनविलेल्या आणि जुळवणी केलेल्या पीएसएलव्हीचे प्रक्षेपण झालेले पाहणे हे आमचे लक्ष्य असेल,’ असे किरणकुमार म्हणाले. ‘अॅस्ट्रोसॅट’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ध्रृवीय उपग्रह प्रक्षेपण यान कार्यक्रमात किमान १५० कंपन्या भागीदार बनतील, असे संकेत त्यांनी दिले.सार्क उपग्रहांबाबत विचारलेल्या प्रश्नावर किरणकुमार म्हणाले, श्रीलंकेने फ्रिक्वेंसीवर आपली स्वीकृती दिली आहे. अन्य देशांची स्वीकृती मिळण्याची इस्रोला प्रतीक्षा आहे. हा उपग्रह २०१६ च्या अखेरपर्यंत प्रेक्षपित करण्याची योजना आहे.-------------‘वेल डन इस्रो’ : पंतप्रधानांकडून अभिनंदन‘अॅस्ट्रोसॅट’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. वेल डन इस्रो. ही भारतीय विज्ञान आणि आमच्या शास्त्रज्ञांसाठी मोठी उपलब्धी आहे, असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.-------भारताचा पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह ‘अॅस्ट्रोसॅट’च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन.-डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय विज्ञान मंत्री
भारताची वेधशाळा अंतराळात झेपावली!
By admin | Published: September 29, 2015 3:00 AM