नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीला अद्याप सहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्याआधीच येथील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाआघाडीत जागा वाटपावरून आतापासून वाद सुरू झाले आहेत. सोमवारी हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन मांझी यांनी महाआघाडीच्या जागा वाटपावरून आरजेडीवर टीका केली. त्याला आरजेडीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
महाआघाडीत राष्ट्रीय जनता दलाची भूमिका मोठ्या भावाची आहे. मात्र आरजेडीकडून मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले जात नसल्याची टीका जीतनराम मांझी यांनी केली. तसेच आरजेडीची भूमिका अशीच कायम राहिली तर महाआघाडीतील घटक पक्षांना मार्च महिन्यानंतर मोठा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मांझी यांनी दिला.
मांझी यांच्या इशाऱ्यानंतर आरजेडीने पलटवार केला आहे. आरजेडी आमदार भाई विरेंद्र म्हणाले की, ज्यांची जेवढी कुवत असेल तेवढ्या त्यांना जागा देण्यात येईल. तसेच जीतन मांझी दुसरीकडून मार्गदर्शन घेत आहेत. त्यांनी दबावाचे राजकारण करू नये, असा इशारा विरेंद्र यांनी दिला. तसेच आरजेडी मोठ्या भावाची भूमिका निभावत असून योग्या वेळी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भाई विरेंद्र यांनी सांगितले.