जयपूर : ध्येय, चिकाटी आणि जिद्द असली की प्रतिकूल परिस्थितीवरही मात करून यश मिळविता येते. कोटा येथील पीयूष मीना याने असेच अपवादात्मक यश मिळवित इतरांसाठी आदर्शवत ठरणारी स्वत:ची अनोखी कहाणी घडवली आहे.पूर्वाश्रमीचे शासकीय शिक्षक असलेले वडील फुलचंद हे हत्येच्या आरोपाखाली कारागृहात असल्यामुळे आणि होस्टेलची फी देण्यासाठी पैसे नसल्यामुळे वडील राहत असलेल्या खुल्या कारागृहातील ८ बाय ८च्या सेलमध्ये राहून त्याला अभ्यास करावा लागला. आयआयटी प्रवेशासाठी असलेल्या जेईई अॅडव्हान्सचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत ४५३वी रँक (अनुसूचित जमाती श्रेणी) घेत त्याने मिळविलेले यश म्हणूनच अनोखे ठरते. खुल्या कारागृहात आरोपीसोबत कुटुंबीयांना राहता येत नाही, पण आरोपीला दररोज कमाईसाठी बाहेर जाता येते. मला मुुलाच्या कोचिंग आणि होस्टेलसाठी २ लाख रुपयांची गरज होती. नातेवाईक, मित्रांची मनधरणी करून १ लाख रुपये जमवता आले, पण त्यात कोचिंगची फीसुद्धा भागत नव्हती.पीयूषचे आयआयटीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खासगी शाळेत नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्यावरील खुनाचा आरोप त्यात अडसर ठरत होता. त्यामुळे मेडिकल स्टोअरमध्ये मदतनीस म्हणून कमी पगाराची नोकरी स्वीकारली, असे फुलचंद यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)खिडकीतील कवडसा ठरला आधार...कारागृहातील अनुभव सांगताना पीयूष भावुक झाला, पण यशाचा आनंदही त्याला लपवता आला नाही. कारागृहातील कडक नियमांमुळे मला प्रारंभी अभ्यास करता येत नव्हता. रात्री ११ वाजता दिवे बंद व्हायचे. खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मी अभ्यास केला. खोली छोटी असल्याने अभ्यास होईस्तोवर पहाटे ४ वाजेपर्यंत वडील सेलबाहेर थांबायचे, असे त्याने सांगितले.मी वडिलांसोबत कारागृहात राहतो हे कुणालाही सांगितले नव्हते मात्र आता वडिलांनी माझ्यासाठी जे केले त्याची तुलना कुणीही करू शकत नाही असे मी अभिमानाने सांगत आहे, असे त्याने म्हटले. फुलचंद यांनी १२ वर्षे कारागृहात काढली. आणखी दोन वर्षांनी शिक्षा पूर्ण होताच मुक्त होण्याची त्यांना आशा आहे. कारावास पूर्ण होताच पीयूषला चांगले आयुष्य देणे हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
खुनी पित्यासोबत जेलमध्ये राहून केली जेईई क्रॅक
By admin | Published: July 01, 2016 5:20 AM