मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने त्यांच्या ताफ्यातील बोईंग ७७७ प्रकारातील ५ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. या विमानांच्या देखभालीबाबत व आणखी काही मुद्द्यांवर अडचणी समोर आल्याने ही प्रक्रिया थंडावली.
जेट एअरवेजची सेवा ठप्प झाल्याने त्यांची सर्व उड्डाणे बंद झाली आहेत. त्यामध्ये मुंबई-लंडन, दिल्ली-लंडन, मुंबई-दुबई, दिल्ली-दुबई व दिल्ली-सिंगापूर या पाच मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांचादेखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर विमानसेवा चालवण्यासाठी जेटच्या ताफ्यातील ५ बोइंग ७७७ विमाने मिळावीत यासाठी एअर इंडिया प्रशासन प्रयत्नशील होते. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांसोबत पत्रव्यवहार केला. मात्र, या विमानांच्या देखरेखीबाबत व इतर अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेण्यात आल्याने ही विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात येण्याची शक्यता धूसर झाली आहे. वेट लीज, ड्राय लीजवर ही विमाने एअर इंडिया चालवण्यास इच्छुक होती.
दरम्यान, एअर इंडियाच्या नरिमन पॉइंट येथील इमारतीमधील काही मजले रिक्त आहेत त्यांना भाड्याने देण्यात येण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. सध्या या इमारतीच्या भाड्यापोटी एअर इंडियाला वार्षिक १०७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सर्व मजले भाड्याने दिल्यावर सुमारे १५० कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, एअर इंडियाची विक्री प्रक्रिया लोकसभा निवडणुकीमुळे ठप्प झाली असून निवडणुकीनंतर याबाबत हालचाली होण्याची शक्यता एअर इंडियाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.वळसा घालून प्रवासपाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर भारतीय विमानांसाठी बंद करण्यात आल्याने पाकिस्तानी हवाई हद्दीऐवजी भारतीय विमानांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. परिणामी एअर इंडियाच्या विमानांना लागणारे अतिरिक्त इंधन, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च व इतर खर्चापोटी दररोज ६ कोटींचा तोटा होत आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापरावर प्रतिबंध घातला आहे.