नवी दिल्ली : ‘जेट एअरवेज’ला पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली असतानाच हवाई वाहतूक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, जेट एअरवेज पुन्हा सुरू होणे अत्यंत कठीण आणि अनिश्चित आहे.
जेट एअरवेजच्या कर्जदात्यांनी शनिवारी लक्षावधी डॉलरच्या समाधान योजनेला मंजुरी दिली. या योजनेनुसार, एक गुंतवणूकदार समूह जेट एअरवेजचे अधिग्रहण करणार आहे. तथापि, जाणकारांना हा मार्ग खडतर वाटत आहे. नागरी उड्डयन क्षेत्रातील सल्ला व संशोधन संस्था ‘कापा इंडिया’चे प्रमुख कपिल कौल यांनी सांगितले की, ‘जेट एअरवेजचे परिचालन पुन्हा सुरू करण्याचा मार्ग प्रचंड कठीण आणि अनिश्चित आहे.’
अनेक महिन्यांच्या वाटाघाटीनंतर लंडनस्थित कार्लोक कॅपिटल आणि यूएईस्थित व्यावसायिक मुरारीलाल जालान यांनी जेट एअरवेजचे अधिग्रहण करण्यास संमती दिली.
कर्जाच्या ओझ्यामुळे गेल्या वर्षी१७ एप्रिल रोजी जेट एअरवेजचे कामकाज थांबले होते. शिखर स्थानी असतानाच्या काळात कंपनीकडे १२0 पेक्षा जास्त विमाने होती. बंद होत असतानाच्या काळात कंपनीकडे फक्त १६ विमाने उरली होती.