ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ११ - मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनला जाताना जेट एअरवेजच्या विमानाने प्रवास केल्याची माहिती मिळाली आहे. 2 मार्चला दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने विजय मल्ल्या लंडनला रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिका-याने दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्ताप्रमाणे विजय मल्ल्या यांनी प्रवास करताना सोबत 7 बॅग होत्या. विजय मल्ल्या यांनी ट्विटवरुन आपण देश सोडून पळालो नसल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी का दिली ? यावरुन आरोप - प्रत्यारोप होत आहेत. तर दुसरीकडे विजय मल्ल्यांना इतक सामान नेण्याची काय गरज याबाबत साशंका निर्माण केली जात आहे. मल्ल्या यांच्यासोबत एक महिलादेखील होती. ही महिला कोण होती याची माहिती अजून मिळू शकलेली नाही.
विजय मल्ल्या यांनी फस्ट क्लासने प्रवास केला. यावेळी त्यांना फस्ट क्लासच्या प्रवाशांना देण्यात येणा-या सर्व सुविधा देण्यात आल्या. 2 मार्चला जेव्हा मल्ल्या यांनी देश सोडला त्यावेळी त्यांच्यावर देश सोडून न जाण्यासाठी कोणतही बंधन घालण्यात आलं नव्हत. मल्ल्यांनी देश सोडल्यावर बँकांनी न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे कोणीतरी मल्ल्या यांना बँका कोणतं पाऊल उचलणार आहेत याची माहिती देत असावं. कारण बँकांनी अर्ज करण्याअगोदरच मल्ल्यांनी देश सोडणं आणि सोबत इतक सामान नेणं यात काहीतरी गडबड असल्याची शंका किंगफिशरमधील एका कर्मचा-याने व्यक्त केली आहे. जेट एअरवेजने याबाबात अजून कोणताच खुलासा केलेला नाही.