ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - विमान रन वेवर उतरवण्याचे सहा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर जेट एअरवेजच्या वैमानिकाने सातव्या प्रयत्नात ब्लाइंड लँडिंग करून विमान उतरवल्याची घटना गेल्यावर्षी केरळमधील विमानतळावर घडली होती. दरम्यान, डीजीसीएने या घटनेच्या केलेल्या चौकशीमधून खराब हमामान आणि इंधन संपत आल्यामुळे विमान तातडीने उतरवण्याचा निर्णय वैमानिकाला घ्यावा लागला. तसेच रन वेवर विमान उतरवण्याचे सहा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर सातव्या प्रयत्नात ब्लाइंड लँडिंग करून विमान रन वेवर उतरवल्याचे समोर आले आहे.
गेल्या वर्षी 17 ऑगस्ट रोजी जेट एअरवेजच्या बोईंग 737 या दोहाहून कोचीला जाणाऱ्या विमानाचे वैमानिकाने तिरुवनंतपुरम येथे ब्लाइंड लँडिंग केले होते. विमानातील इंधन संपत आले असताना आणि सहा प्रयत्न अपयशी ठरल्यावर सातव्या प्रयत्नात विमान रन वेवर उतरवण्यात वैमानिक यशस्वी ठरला होता.
दरम्यान, डीजीसीएने सरकारला दिलेल्या अहवालात अशी घटना मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकते, असे म्हटले आहे. विमान उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरवर रेकॉर्ड झालेल्या संभाषणानुसार तुम्हाला रन वे दिसत आहे का असे विचारण्यात आले असता आम्ही अंध बनून चाललोय असे उत्तर विमानाच्या वैमानिकाने दिले होते. मात्र विमानात फार कमी इंधन उरल्याने वैमानिकासमोर विमान उतरवण्याशिवाय पर्याय नव्हता.