नवी दिल्ली : जेट एअरवेजच्याविमानांमध्ये बिघाड होण्याच्या घटना वारंवार घडत असून मुंबई-औरंगाबाद विमानाचा थरार ताजा असतानाच आज पुन्हा तब्बल 36 हजार फुटांवर विमानाचे इंजिन बंद पडल्याने इंदोर विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. गेल्या आठवड्यातही मुंबई- जयपूर विमानामधील प्रवाशांना नाकातून आणि कानातून रक्त येण्याचा त्रास सुरु झाल्याने विमान पुन्हा मुंबईला आणण्यात आले होते.
आज सकाळी 10.48 मिनिटांनी जेट एअरवेजच्या विमानाने 96 प्रवाशांना घेऊन हैदराबाद विमानतळावरून उड्डाण केले होते. मात्र, 36 हजार फूट म्हणजेच 11 किमी उंचीवर असताना इंजिनामध्ये बिघाड झाला. यावेळी विमान 850 किमी प्रति मैल या वेगात होते. यामुळे विमानाला इंदोर विमानतळावर तातडीने उतरविण्यात आले. पायलटांनी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनीच्या तंत्रज्ञांना या प्रकाराबाबत कळविले असून विमानाची दुरुस्ती सुरु आहे.
तसेच गेल्या आठवड्यात मुंबई- जयपूर विमानामध्ये हवेच्या दाबाचा बिघाड झाल्याने 33 प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले होते. यामुळे त्यांना पुन्हा मुंबई विमानतळावर आणण्यात आले.