मुंबई/नवी दिल्ली : जेट एअरवेज बंद पडल्यामुळे दिल्ली व मुंबई विमानतळावर रिक्त झालेले ४४० स्लॉट्स इतर विमान वाहतूक कंपन्यांना देण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे त्या स्लॉटमध्ये अन्य कंपन्या आपल्या विमानांचा वापर करू शकतील.जेट एअरवेजची विमाने जमिनीवर आल्यामुळे देशांतर्गत विमान वाहतुकीची क्षमता घटली आहे. परिणामी हवाई भाड्यात वाढ झाली आहे. ही भाडेवाढ थांबावी आणि भाडी पूर्ववत व्हावीत, यासाठी हे स्लॉट्स इतर कंपन्यांना देण्यात येणार आहेत.नागरी विमान वाहतूक सचिव प्रदीपसिंग खरोला म्हणाले की, जेट एअरवेजने दिल्ली व मुंबई विमानतळावरील ४४० स्लॉट्स रिकामे केले आहेत. हे स्लॉट तात्पुरत्या स्वरूपात इतर कंपन्यांना वितरित केले जातील. मुंबईत २८० तर दिल्लीत १६० स्लॉट रिकामे आहेत. ही दोन्ही विमानतळे देशातील सर्वाधिक गर्दी असणारी आहेत. रिक्त झालेल्या स्लॉटचे वितरण डीजीसीए, विमानतळ प्राधिकरण व संबंधित विमानतळ यांचे प्रतिनिधी यांच्या समितीकडून केले जाईल.खरोला म्हणाले की, तीन महिन्यांत आणखी ३० विमाने अन्य कंपन्यांच्या ताफ्यात येणार आहेत. जेट एअरवेजच्या मालकीच्या १५ विमानांचा वापर करण्याचा मार्ग कंपनीला कर्ज देणाऱ्या बँका शोधत आहेत. कंपनीच्या मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठीही बँका चर्चा करीत आहेत.।स्पर्धक कंपन्या सरसावल्याजेट एअरवेजचे विमानतळांवरील रिक्त स्लॉट मिळविण्यासाठी स्पाइस जेट व एअर इंडिया या कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. जेटची पडून असलेली विमाने भाड्याने घेण्याची संधीही विमान कंपन्यांना आहे. ही विमाने इतर कंपन्यांनी मिळविल्यास ऐन सुट्यांच्या हंगामात निर्माण झालेली विमानांची टंचाई दूर होईल आणि वाढलेले भाडेही कमी होण्यास मदत होईल.
जेट एअरवेजचे ४४० रिक्त स्लॉट्स इतर कंपन्यांना देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 6:42 AM