अहमदाबाद- जेट एअरवेजच्या मुंबई- दिल्ली विमानाचं सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाचे लँडिंग करण्यात आलं होतं. विमानात उर्दू भाषेतील एक पत्र सापडलं होतं,या पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती, या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. विमानात धमकीचं पत्र सापडल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी करण्यात आली.
जेट एअरवेजचं 9डब्ल्यू 339 हे विमान मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी निघालं होतं. पहाटे तीनच्या सुमारास विमानाने मुंबईतून उड्डाण केलं. पण पावणे चारच्या सुमारास विमानाचं अहमदाबादमध्ये लँडिंग करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं असून सुरक्षा दलाचे पथक विमानाची तपासणी केली. विमानात 115 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्स होते.
विमानात उर्दू भाषेतील एक पत्र सापडल्याचे वृत्त समोर आलं होतं. या पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती, असंही माहिती समोर आली होती.पण या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. जेट एअरवेजने या वृत्तावर ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. आम्ही सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत असून प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे जेट एअरवेजने म्हटलं आहे.