नवी दिल्ली, दि. 26- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी दाखल केलेल्या १० कोटींच्या बदनामी दाव्याचा खटला लढणारे प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी केजरीवाल यांना सोडचिठ्ठी दिली आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना एक पत्र लिहून या प्रकरणातून बाजूला होत असल्याचं सांगितलं आहे. तसंच या खटल्याचं २ कोटी रुपयांहून अधिक फी द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात,'केजरीवाल हे अरूण जेटलींच्या विरूद्ध जास्त आक्षेपार्ह भाषेचा वापर करायचे',असा आरोप केला आहे. जेठमलानी यांनी त्यांच्या 2 कोटी रूपयांपेक्षा जास्त कायदेशीर फीची मागणीही केली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
केजरीवाल आणि इतर पाच आप नेत्यांविरोधात अरुण जेटली यांनी १० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी जेठमलानी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला होता. केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनेवरून असभ्य भाषेचा वापर केला का, याबाबत जेटली यांनी स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावेळी जेठमलानी यांनी आपण केजरीवाल यांच्या सूचनेनुसारच असभ्य भाषेचा वापर केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला होता. हा नवा खटला दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. तसंच जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषा वापरली जावी, अशा कोणत्याही सूचना आपण दिल्या नव्हत्या, असं त्यांनी जेठमलानी यांना पत्रात सांगितलं होतं. त्यानंतर जेठमलानी यांनी केजरीवालांचा खटला लढणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. तसंच हा खटला लढण्यासाठीची फी द्यावी, असंही जेठमलानी म्हणाले आहेत.
दिल्ली सरकारने याआधी फेब्रुवारी महिन्यात जेठमलानी यांची साडेतीन कोटी रूपये फी दिली आहे. राम जेठमलानी यांनी केजरीवाल यांच्या बाजूने 11 वेळा कोर्टात बाजू मांडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातून या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. जेठमलानी यांच्या निर्णयाबद्दल अजून अधिक माहिती मिळाली नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. केजरीवाल यांनी मला पत्र लिहिलं होतं. त्याच पत्राचं उत्तर मी पाठवलं आहे. या पत्रात केजरीवाल काय म्हणाले याचा खुलासा करणार नसल्याचं जेठमलानी यांनी सांगितलं आहे. तुम्ही केजरीवालांकडे ही दोन्ही पत्रं सगळ्यांसाठी उपलब्ध करण्याची मागणी करू शकता. मी त्या पत्रातील माहिती सांगणार नाही, कारण तसं मी केजरीवाल यांना वचन दिल्याचं, जेठमलानी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं आहे.