गाझियाबादमधील मोदीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील राज चोपला परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेतून लाखो रुपयांचे दागिने गायब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ईशा गोयल यांनी आरोप केला आहे की, तिच्या लॉकरमधून ४० तोळं सोनं आणि चांदीचे दागिने, ज्यांची एकूण किंमत तब्बल ४० लाख रुपये आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ईशा गोयल यांनी सांगितलं की, त्यांना बँकेतून फोन आला की, त्यांचं लॉकर उघडं आहे. बँकेत पोहोचल्यावर लॉकरमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या घटनेनंतर ग्राहकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. सध्या बँक आणि पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ईशा गोयल यांचं म्हणणं आहे की, लॉकर तीन लोकांच्या नावावर आहे आणि बँकेकडून माहिती मिळाल्यानंतर दागिने गायब झाल्याचं समजलं. याबाबत बँक कर्मचारी बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. बँकेच्या लॉकरसारख्या सुरक्षित ठिकाणाहून एवढी मोठी चोरी झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्राहकांची चिंता वाढली आहे.
ईशा यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी बँक लॉकर क्रमांक बी-४२ मध्ये दागिने ठेवले होते. हे लॉकर ईश यांच्या, पती अंकुश आणि सासरे जयकिशन यांच्या नावावर आहे. त्या वेळोवेळी जाऊन लॉकर तपासायच्या. २८ ऑगस्ट रोजी सासरच्यांनी येऊन लॉकर तपासले असता त्यात दागिने ठेवले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचं सांगितलं आहे.