बापरे! ...म्हणून 'त्या' गावात जिवंत माणसाची काढण्यात आली अंत्ययात्रा; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:53 AM2021-07-12T09:53:59+5:302021-07-12T09:55:50+5:30
Jhabua Funeral of a living man : थेट जिवंत माणसाची अंत्ययात्रा काढण्यात आल्याची अजब घटना घडली आहे.
नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये (Jhabua) चांगला पाऊसच पडत नाही. तेथील लोक गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडावा म्हणून विविध गोष्टी देखील केल्या जातात. चित्र-विचित्र प्रकार केले जातात. झाबुआमधील लोकांनी देखील इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. भरपूर पाऊस पडावा म्हणून शहरात थेट जिवंत माणसाची अंत्ययात्रा (Funeral of a living man) काढण्यात आल्याची अजब घटना घडली आहे. इंद्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी गावकरी अशा विचित्र वाटणाऱ्या पद्धतीचा अवलंब करत असतात.
लोकांचा विश्वास आहे की या प्रकारामुळे इंद्रदेव प्रसन्न होतील आणि जोरदार पाऊस पडेल. अशोक नावाच्या तरुणाची जिवंत अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. अशोकने दिलेल्या माहितीनुसार, "जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. जर पाऊस पडला नाही तर बियाणं वाया जातील. अशात लवकरात लवकर पाऊस पडण्याची गरज आहे. जेव्हा पाऊस हुलकावणी देतो तेव्हा गावकरी अशा प्रकारे अंत्ययात्रा काढतात. जिल्ह्यात अद्याप पावसाचा हवा तसा जोर दिसत नाही. गावकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचं संकट ओढवलं आहे."
"महागाईही वाढली आहे. अशात दुबार पेरणी करावी लागली तर शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडेल" असं देखील अशोकने म्हटलं आहे. गावात अशाप्रकारे पावसासाठी निसर्गाची पूजा केली जाते. जेणेकरून चांगला पाऊस पडेल आणि यंदा उत्तम पीक येईल अशी लोकांची आशा आहे. झाबुआ जिल्ह्यात प्रामुख्याने मका आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं. जिल्ह्यातील बहुतांश गरीब आदिवासी हे आपल्या शेतात मक्याचं पीक घेतात. तसेच झाबुआमधील ग्रामीण भागातील लोकांचं हेच मुख्य भोजन आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
शेतकरी आंदोलकांची भाजपा नेत्यावर दगडफेक, लाठ्या-काठ्यांनी केला हल्ला; पोलिसांनी वाचवला जीव#BJP#BhupeshAggrawal#Farmers#FarmerProtest#Policehttps://t.co/QRcTEV67b1pic.twitter.com/FH9vxI4mkU
— Lokmat (@MiLOKMAT) July 12, 2021