झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी रात्री रुग्णालयातील शिशु वॉर्डमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत १० चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांनी आपली मुलं गमावली.
आज तकशी बोलताना एका लहान मुलाचे वडील कुलदीप यांनी टाहो फोडला. त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा ७-८ तासांपासून बेपत्ता होता. मदतीच्या नावाखाली आजपर्यंत एकही अधिकारी भेटायला आलेला नाही. ही दुर्घटना घडली त्यावेळी वॉर्डमध्ये जवळपास ५० मुलं होती. आग लागल्यावर ज्यांची मुलं होती ते थेट आत घुसले आणि त्यांनीच आपल्या मुलांना वाचवलं.
ललितपूरच्या संजना यांच्या चिमुकल्याचा देखील या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. संजना यांचं हे पहिलंच मूल होतं. तुमच्या मुलाची प्रकृती कशी आहे? असा प्रश्न संजना यांना विचारला असता त्या रडायला लागल्या. आमचं बाळ भाजलं, आम्ही त्याला नीट पाहूही शकलो नाही. त्याचा मृत्यू झाला असं म्हटलं आहे.
वॉर्डातील मुलांना वाचवणाऱ्या याकूबने सांगितलं की, मुख्य गेटमधून कोणालाही आत जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्याने विटा आणि दगडांनी खिडकी फोडून मुलांना वाचवलं. यावेळी अनेक जण मुलांसह पळून गेले. या आगीत आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाच्या परिसरात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. ललितपूर येथील एका खाजगी रुग्णालयात पत्नीची प्रसूती झाली तेथून बाळाला सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं मात्र रात्री लागलेल्या आगीत बाळाला जीव गमवावा लागला.
१० मुलांचा मृत्यू, १६ जखमी
झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान १० मुलांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे.
आगीमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावू लागले, त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून ३७ जणांना सुखरूप बाहेर काढले. अपघाताच्या वेळी एनआयसीयूमध्ये एकूण ५४ मुलांना दाखल करण्यात आले होते.